कोकणात पावसाळ्यातही आंब्यांच्या काही झाडांना फळधारणा होत असून, ऑक्टोबरमध्येच हे फळ बाजारात पाठविण्याचा काही बागायतदारांचा प्रयत्न असतो. मात्र या नाजूक फळाला पाणी लागल्याने तो आतून व बाहेरून खराब होतो असे निष्पन्न झाले आहे. कोकणात आता कुठे झाडे मोहरासाठी फुटू लागली असून, पुढील महिन्यात पडणाऱ्या थंडीवर हा मोहर अवलंबून आहे. त्यामुळे यंदा हापूस आंब्याचा खरा मोसम हा फेब्रुवारीत सुरू होण्याचे संकेत आहेत. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन घटणार असल्याचा अंदाज बागायतदार व्यक्त करीत आहेत.

कोकणात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. पाऊस नसतानाच्या कोरडय़ा हवामानामुळे हापूस आंब्याच्या काही झाडांना फळधारणा झाली आहे. ही झाडे अतिशय तुरळक व बोटावर मोजण्या इतकी आहेत. अशी फळधारणा होऊन काही फळे झाडांना लागतात, पण प्रत्येक बागायतदार ते आंबे बाजारात पाठवतोच असे नाही. दापोली येथील बागायतदार उदय नरवणकर यांनी आपल्या बागेतील सव्वा चार डझनाचे आंबे मुंबई बाजारात पाठविले आहेत. मात्र त्यामुळे हापूसचा मोसम सुरू झाला असे म्हणता येणार नाही. अशी अवकाळी उत्पादने ही निकृष्ट असल्याचे मत अनेक व्यापारी व्यक्त करीत आहेत. यावर्षी पाऊस कमी असल्याने थंडीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेब्रुवारीनंतर सुरू होणारे हे उत्पादन यंदा पुन्हा घटण्याची शक्यता आहे. हापूस आंब्याच्या बाजारात आता स्पर्धा वाढली असून, कल्टरचा वापर करून हापूस आंब्याची वाढ केली जात आहे. मात्र ग्राहक या आंब्यांना चार हात दूर ठेवू लागल्याने सेंद्रिय खतावरील उत्पादनाकडे बागायतदारांचा कल पुन्हा वाढू लागला आहे. कोकणात आता झाडांना मोहराचे धुमारे फुटू लागले असून, पुढील महिन्यात पडणाऱ्या थंडीनंतर मोहराची फळधारणा सुरू होणार आहे. यात नर आणि मादी मोहर किती आहे. त्यावर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करणे शक्य होणार असल्याचे बागायतदारांचे मत आहे.