कामोठे येथील एमजीएम रुग्णालयासमोरील सेवा मार्गाची दुरवस्था झाली असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. दीड ते दोन फुटांचे हे खड्डे असून शुक्रवारी याचा फटका रुग्णसेवा देणाऱ्या एका रुग्णवाहिकेला बसला. पावसामुळे रस्त्याचे डबके  झाल्याने यात रुग्णवाहिका अडकून पडली.

दोन तास ही रुग्णवाहिका अडकून पडली होती. रुग्णालयातील दोन मदतनीस आल्यानंतर धक्का मारून रुग्णवाहिका पाण्यातून बाहेर काढावी लागली. या मार्गावर पथदिवे नसल्याने तसेच येथे सिडकोने खबरदारीच्या कोणत्याही उपाययोजना न घेतल्याने रात्री अनेक रुग्णांना रुग्णालयात पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. रुग्णालय व्यवस्थापनाने याबाबत अनेक पत्रे सिडकोला दिली, मात्र त्यावर कोणत्याही उपाययोजना झाल्या नाहीत. हा मार्ग सिडकोच्या मालकीचा आहे. करोना संकटकाळात वेळेत उपचार मिळणे हेच गरजेचे आहे त्यामुळे शहरातील एमजीएम रुग्णालयांसह इतर सर्वच रुग्णालयांमध्ये जाण्यासाठीचे मार्ग विनाअडथळ्याचे, गतिमान व सुरक्षित असावेत अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे. एमजीएम रुग्णालयासमोरील शीव-पनवेल महामार्ग आहे. या महामार्गावर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडेही दुर्लक्ष होत आहे.