अनेक मार्गात बदल; अतिरिक्त ९० पोलिसांची व्यवस्था

अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाऱ्या सार्वजनिक विसर्जन सोहळ्यासाठी वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ  नये यासाठी वाहतूक पोलिसांनी चोख व्यवस्था केली आहे. त्यादिवशी जड वाहनांना शहरात प्रवेश बंदी असून अनेक विसर्जन मार्गात बदल करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पाचशे वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त असून पोलीस मुख्यालयाकडून अतिरिक्त ९० पोलीस पुरवण्यात आल्याची माहिती नवी मुंबई वाहतूक विभागाने दिली.

शहरात पालिकेच्या २२ तलावांवर गणपती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु शहरात सर्वाधिक विसर्जनासाठी शिरवणे, वाशी, कौपरखैरणे येथील तलावांवर गर्दी होत असते. या भागात वाहतूक कोंडीची शक्यता असते. त्यामुळे येथील अनेक मार्गात वाहतूक विभागाने बदल केले आहेत. गाडी बंद पडून वाहतूक कोंडी होऊ  नये यासाठी क्रेनची व्यवस्था केली आहे.

वाहतूक नियोजन कोपरखैरणे विभाग

कलश उद्यान चौक ते वरिष्ठा चौक, सिरॉक प्लाझा ते कोपरखैरणे स्मशानभूमी या भागात ‘नो पार्किंग’ घोषित करण्यात आले आहे. तर गणेश दर्शन सोसायटी ते गणेश विसर्जन तलाव तसेच संगम डेअरी ते वरिष्ठा चौक सेक्टर १९ येथे वाहनांना प्रवेश बंदी असेल.

वाशी विभाग

वाशी चौकात विसर्जन वाहनांशिवाय इतर वाहनांना बंदी. ऐरोली, कोपरखैरणे या दिशेने वाशीकडे येणारी वाहने ब्ल्यू डायमंड हॉटेलकडून वळवून पामबीच मार्गाने बाहेर जातील. वाशी स्टेशन व महामार्गाकडून वाशीत येणारी वाहने वाशी प्लाझाकडून पामबीचला जातील. वाशी शहरातील वाहने वाशी हॉस्पिटलकडून ‘ब्ल्यू डायमंड’ हॉटेलकडून पामबीचला जातील तसेच वाशी सेक्टर १ ते ८ ची वाहने वाशी पोलीस स्टेशनकडून अपना बाजार मार्गे वाशीकडे जातील. तुर्भे विभागातून वाशीकडे येणारी वाहने वाशी चौकाकडे न जाता सिग्नलवरून कोपरीकडे तसेच महात्मा फुले चौकाकडे जातील.

 नेरुळ विभाग

शिरवणे चिंचोला तलाव परिसरात भुयारी मार्गातून व विसर्जन तलावावर फक्त विसर्जनासाठी येणाऱ्या वाहनांना प्रवेश असेल. हे सर्व वाहतूक बदल व प्रवेश बंदी गुरुवारी दुपारी १२ ते शुक्रवारी सकाळी ६ वाजेपर्यंत असणार आहेत.

वाहतूक विभागाने अनंत चतुर्दशीच्या विसर्जन व्यवस्थेसाठी चोख व्यवस्था केली आहे. जड वाहनांना बंदी घालण्यात येणार असून वाहतूक विभागाव्यतिरिक्त पोलीस मुख्यालयाकडून अतिरिक्त ९० पोलिसांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोठेही वाहतूक कोंडी होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. – सुनील लोखंडे, उपायुक्त वाहतूक पोलीस