यंदा उत्पादनात घट होण्याची शक्यता; १५ एप्रिलनंतरच हंगाम

वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात देवगड व केरळचा हापूस आंबा दाखल होण्यास सुरुवात झाली आहे, मात्र अवकाळी पावसामुळे हापूसला अ‍ॅन्थ्राक्नोस रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने यंदा उत्पादनात घट होण्याची शक्यता, व्यापारी व्यक्त करत आहेत.

ओखी वादळाने देवगडच्या हापूस आंब्याचा हंगाम तर लांबला आहेच, मात्र रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. देवडग हापूस दाखल होण्यास १९ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. सोमवारी फळ बाजारात २०० ते ३०० पेटय़ा दाखल झाल्या असल्या तरी तो ‘आगप’ शेतमाल आहे, असे व्यापऱ्यांचे म्हणणे आहे. अवकाळी पावसातून वाचलेल्या आणि भरपूर प्रमाणात पाणी लागल्यानंतरही तगलेल्या शेतमालाला व्यापारी बोली भाषेत ‘आगप’ माल म्हणतात. सध्या बाजारात तशा प्रकारचा हापूस येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आवक वाढली आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

हापूस उत्पादनावर बदलत्या हवामानाचादेखील परिणाम होत आहे. डिसेंबरमध्ये पडलेल्या पावसामुळे मोहर, फळधारणा झालेल्या आंब्याचे नुकसान झाले. आता बदलत्या उष्ण-दमट हवामानात आंबे गळून पडत आहेत. पिकांचे नुकसान होत आहे. मकरसंक्रांतीदरम्यान उष्णता वाढल्याने त्याचा पिकावर परिणाम झाला. थंड वातावरण हापूसला पोषक आहे, परंतु मध्येच उष्णता वाढल्याने नवीन मोहर जुन्या आंब्याचा रस शोषून घेत आहेत. जुने आंबे गळून पडत असल्यामुळे हाता तोंडाशी आलेल्या पिकाची नासाडी होत आहे.

१५ फेब्रुवारीपर्यंत जास्त आवक होईल त्यानंतर आवक कमी होऊन मार्चपर्यंत तुरळक प्रमाणात हापूस दाखल होईल आणि १५ एप्रिल नंतर मोठय़ा प्रमाणात आवक सुरू होईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. देवडगच्या हापूस बरोबर केरळचा हापूसदेखील दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. देवडगच्या हापूसला प्रति पेटी तीन ते सात हजार रुपये तर केरळ हापूसला प्रतिकिलो २०० रुपये बाजारभाव आहे.

काय आहे अ‍ॅन्थ्राक्नोस’?  

एन्थ्रेक्नोज हा रोग पिकाच्या पांनाना व फळांना लागतो. पिवळे, काळे डाग पडण्यास सुरुवात होते. अवकाळी पावसामुळे हापूसवर अधिक पाण्याचा मारा झाला होता. त्यामुळे आंब्यावर काळे ठिपके पडले होते. कालांतराने हे डाग संपूर्ण आंब्याला लागून आंबे गळून पडतात.

बाजारात देवगडचा हापूस दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र आता येणारा हापूस हा ‘आगप’ शेतमाल आहे. एप्रिलनंतर देवगड हापुसचा खरा हंगाम सुरू होईल.

संजय पिंपळे, फळ व्यापारी, एपीएमसी