नवी मुंबई महापालिकेकडून जबाबदाऱ्यांचे वाटप

नवी मुंबई : मुंबईत मोठय़ा प्रमाणात वाढणाऱ्या करोना रुग्णसंख्येला रोखण्यासाठी राज्य शासनाने सात सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून एक टास्क फोर्स तयार केला आहे. त्याच धर्तीवर नवी मुंबईतही वाढणाऱ्या करोनाच्या प्रादुर्भावाला पायबंद घालण्यासाठी पालिकेच्या उच्च अधिकाऱ्यांचा एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत.

नवी मुंबईत करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. करोना रुग्णांची संख्या सातशे रुग्णांवर गेली असून यात घरात अलगीकरण कराव्या लागणाऱ्या रहिवाशांची संख्या दहा हजाराच्या जवळपास गेली आहे. त्यामुळे भविष्यात शहरात करोना रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी पालिकेतील काही उच्च अधिकाऱ्यांवर प्रत्येक सेवेची स्वतंत्र जबाबदारी सोपविली आहे. पनवेल येथील कोव्हिड केअर सेंटरवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड यांच्यावर सोपविण्यात आली असून वाशी येथील सिडकोच्या प्रदर्शन केंद्रात उभारण्यात येणाऱ्या नवीन कोव्हिड रुग्णालय उपायुक्त अमोल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त तुषार पवार हे शहरातील सर्व निर्जंतुकीकरणाचे काम पाहणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अधिकारी त्याच प्रमाणे मजूर कामगार यांची वाहतूक पाहण्याचे काम ‘एनएमएमटी’चे व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांच्यावर सोपविण्यात आले असून खासगी रुग्णालयाबरोबरचे समन्वक म्हणून नव्याने नियुक्त झालेले उपायुक्त डॉ. राहुल गेठे पाहणार आहेत. मालमत्ता विभागाचे उपायुत्त दादासाहेब चाबुकस्वार यांच्यावर मजूर आणि इतर वैद्यकीय कर्मचारी पुरवठय़ाची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अमरिश पटनिगिरे यांची यापूर्वीच कोव्हिड समस्या निवारणासाठी मुख्य समनव्यक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.