07 July 2020

News Flash

नवी मुंबईची भरारी

सिडकोची नवी मुंबई मेट्रो लवकरच धडधडणार आहे.

संतोष जाधव

१९६०च्या दशकात मुंबईला पर्याय म्हणून एका बेटावर सिडकोच्या माध्यमातून नियोजनबद्ध विकास केलेल्या नवी मुंबई शहराचे वय अवघे ६० वर्षे आहे, मात्र सिडको व महापालिकेच्या नियोजनामुळे या शहराला राहण्यासाठी नागरिक मोठय़ा प्रमाणात पसंती देत आहेत. त्यात आता आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रोचे जाळे व होत असलेल्या तिसऱ्या मुंबईचा विकास पाहता या शहराची ‘झेप’ कायमच उंचावत राहणार आहे. वीजपुरवठा, सर्वंकष गृहनिर्मिती, रोजगार निर्मिती ई-गव्हर्नन्स, शिक्षण, आरोग्य, दळणवळण आणि नियमित पाणीपुरवठा यात हे शहर उजवे आहे.

नवी मुंबईतील साडेचारशे किलोमीटरचे विस्तीर्ण रस्ते, सिडकोने ४६ टक्के ठेवलेली मोकळी जमीन, दोनशेपेक्षा जास्त उद्याने, २४ तास पाणीपुरवठा, आठ लाखापर्यंतची वृक्षसंपदा, पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी डच पद्धतीचे नाले, समुद्राच्या भरतीचे पाणी थेट शहरात जाऊ नये यासाठी करण्यात आलेली धारण तलाव उपाययोजना, सीसी टीव्हीचे जाळे, वाहतूक बेटांचे सुशोभीकरण, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, अद्यावत क्षेपणभूमी, पाच स्तराची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, आधुनिक व अद्यावत पालिका शाळा, वाढती विद्यार्थी संख्या, अल्पकाळात झालेली शैक्षणिक पंढरी, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेले लक्षवेधी प्रयत्न, आर्कषक रेल्वे स्थानक, आयटी कंपन्यांची पसंती, पारसिक डोंगर आणि ठाणे खाडीमधील नैसर्गिक भूभागावर वसलेले सुंदर शहर, तीन हजार छोटय़ा-मोठय़ा कारखान्यांतील उद्योग आणि रोजगार, दळणवळणाची साधने, ९६ टक्के सुशिक्षित नागरिक, कमी गुन्हेगारी, आशिया खंडातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ आणि या सर्व सुविधांमुळे तयार झालेली उत्तम जीवनशैली, यामुळे नवी मुंबईला राहण्यायोग्य शहर म्हणून पसंती दिली जात आहे.

मुंबई, ठाणे, पुण्यासारखी नवी मुंबईत सांस्कृतिक चळवळ रुजलेली नाही तसेच पश्चिम बाजूस असलेल्या विस्तीर्ण झोपडपट्टी व प्रदूषण या काही समस्या आहेत. पण, अलीकडे नवी मुंबईतील दगडखाणींचा खडखडाट बंद झाला असल्याने नवी मुंबईच्या उत्तर बाजूस प्रदूषणाची पातळी तुलनेने कमी झाली आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे नवी मुंबईला एक वेगळेच महत्त्व निर्माण होत आहे. नवी मुंबईचा पनवेल परिसरात झपाटय़ाने विकास होत असून सर्व प्रशासकीय यंत्रणांनी याकडे लक्ष दिले आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या चारही बाजूंनी विकास होणार आहे. नवी मुंबई विमानतळ प्रकल्प हा या भागाचा कायापालट करणारा ठरणार आहे. हा विकास शास्त्रोक्त व नियोजनबद्ध व्हावा यासाठी सिडकोने एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यात येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर जास्त लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. राज्यातील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुंबईशी सलंग्नता वाढावी यासाठी न्हावा शेवा-शिवडी सागरी सेतूचेही काम सुरू आहे. त्यामुळे केवळ २२ मिनिटात नवी मुंबई गाठता येणार आहे. सिडकोची नवी मुंबई मेट्रो लवकरच धडधडणार आहे. तिचा प्रवास खांदेश्वरहून नवी मुंबई विमानतळाला होणार आहे.

मुंबई-पुणे प्रवास गतिमान होण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणाहून जाणाऱ्या महामार्गाला अधिक गतिमान केले जात असून वाशी ते पनवेल दरम्यान होणारी महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पारसिक हिल डोंगररांगामधून ‘एक्स्प्रेस वे’ला जोडणारा नवा मार्ग दृष्टिक्षेपात आहे. एकीकडे मुंबईसह विविध महानगरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना हे जलसंपन्न शहर आहे. खारघर परिसरात मुंबईतील बीकेसीच्या धर्तीवर कॉर्पोरेट हब निर्माण होणार असून त्या ठिकाणी जगभरातील कंपन्यांची उत्सुकता शहरात पाय रोवण्याच्या प्रतीक्षेत आहे. शहरात टोलेजंग इमारतींबरोबरच आधुनिक राहणीमानासाठी आवश्यक ठरलेली मॉलसंस्कृती विकसित झाली आहे. तर देश-विदेशातील शैक्षणिक संस्थांचा ओढा या शहराकडे आहे. स्वच्छतेबाबत मागील चार वर्षे सातत्याने नवी मुंबई शहराला गौरविले जात आहे.

या सर्व प्रकल्पामुंळे नवी मुंबई शहराला भूतकाळ नसला तरी भविष्यकाळ चांगला असल्याने या शहराला मोठय़ा प्रमाणात पसंती दिली जात आहे. मुंबईप्रमाणे नवी मुंबई घुसमटली जाऊ नये म्हणून आताच तिसऱ्या मुंबईचे रायगड जिल्ह्य़ात नियोजन सुरू  आहे. त्यामुळे आगामी काळात नवी मुंबई शहराला लाभलेला आधुनिकतेचा व विकासात्मक बदल शहराला अधिक उंचीवर नेणारा ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 3:22 am

Web Title: article about navi mumbai city zws 70
Next Stories
1 करोना ‘पॉझिटिव्ह’ अधिकाऱ्याची अविरत रुग्णसेवा
2 ‘एपीएमसी’त यंदा धान्याची आवक निम्म्यावर
3 नवी मुंबईतील करोनाबाधितांनी ओलांडला सहा हजारांचा टप्पा
Just Now!
X