नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांसाठी विविध सोयीसुविधा आणि कोटय़वधी रुपयांचे प्रकल्प वापराविना पडून आहेत.

विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे अनेक तयार प्रकल्पांचे उद्घाटन अद्याप झालेले नाही. परंतु लवकरच हे प्रकल्प जनतेच्या सेवेत येणार आहेत. याबाबत महापौरांशी बोलणी  करणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली.

घणसोली येथील सेंट्रल पार्क वापराविना पडून आहे. त्यामुळे या ठिकाणी देखभाल दुरुस्तीचे कंत्राट आणण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली आहे. पार्कच्या वापरासाठी आयुक्तांनी उद्घाटनासाठी आग्रह धरला आहे. त्यासाठी ते लोकप्रतिनिधी आणि महापौरांशी चर्चा करणार आहेत.

ग्रंथालय बहुउद्देशीय इमारत, उद्याने, सानपाडा येथील सेक्टर-१०मधील सेन्सरी पार्क, अण्णा भाऊ  साठे बहुउद्देशीय इमारत, वाशी अग्निशमन केंद्र, तसेच वाशी अग्निशमन विभाग कर्मचारी निवासी संकुल, ऐरोली सेक्टर-१७ येथील अभ्यासिकांचे अद्याप उद्घाटन झालेले नाही. आधी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे हे प्रकल्प खुले होऊ शकले नाहीत. यातील काही प्रकल्प निव्वळ श्रेयवादाच्या कचाटय़ात सापडले आहेत.

ऐरोलीतील अभ्यासिकेची इमारत वापरात नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे जागेअभावी तसेच अभ्यासकासाठी आवश्यक वातावरणाअभावी नुकसान होत आहे. सानपाडा येथील अण्णा भाऊ  साठे समाज मंदिर पूर्ण होऊन तीन वर्षे झाली आहेत. तरीही या वास्तूचा पूर्ण वापर होऊ शकलेला नाही.

तुर्भे येथील शहरातील पहिला क्लॉक टॉवर बनवून तयार करण्यात आला आहे. शहरवासीयांसाठी उत्सुकता असलेले टॉवरचे उद्घाटन झालेले नाही.

आचारसंहिता आणि दिवाळीनंतर काही काळ हे काम थांबले होते. शहरातील तयार प्रकल्पांचे उद्घाटन लवकरात लवकर करण्यात येईल.

– जयवंत सुतार, महापौर