|| संतोष जाधव

ब्युटीफुल टुमारो फाऊंडेशन, खारघर, सेक्टर २०

शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या मुलांना शिक्षण मिळावे, या हेतूने ब्युटीफुल टुमारो फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. या संस्थेने तळागाळातील वस्त्यांत व शाळाबाह्य़ मुलांच्या दारापर्यंत ज्ञानगंगा पोहोचवली आहे.

टोलेजंग इमारती आणि सुनियोजित शहराचे बिरुद मिरवणाऱ्या नवी मुंबईत अनेक ठिकाणी झोपडपट्टय़ा आहेत. त्यात अनेक वीटभट्टीवरचे मजूर, बांधकाम मजूर राहतात. ज्यांना झोपडय़ाही परवडत नाहीत, त्यांनी पुलांखाली, पदपथांवर आश्रय घेतलेला दिसतो. या मजुरांच्या मुलांसाठी त्यांच्या गल्लीबोळांपर्यंत शिक्षणाचा प्रवाह नेण्यासाठी ही संस्था गेली अनेक वर्षे कार्यरत आहे.

अनेक मजूर कामासाठी सतत स्थलांतर करत असतात. साहजिकच त्यांच्या मुलांच्या शिक्षणात अडथळे येतात. अशा शिक्षणाची आवड असलेल्या, मात्र अपरिहार्य कारणांमुळे शाळेत प्रवेश घेऊ शकत नसलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षण देण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे.

विशेष मुलांच्या पालकांच्या समस्या आणखी वेगळ्या आहेत. आपले मूल विशेष आहे, या न्यूनगंडामुळे त्यामुळे त्याला समाजापासून वेगळे ठेवण्याचा प्रयत्न अनेक पालक करताना दिसतात. त्यामुळे या मुलांपुढील समस्या आणखी जटिल होत जातात. अशा पालकांचे उद्बोधन करण्यासाठी, त्यांच्या मुलांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रा. डॉ. स्वाती खाडे यांच्या पुढाकाराने ब्युटीफुल टुमारो फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. प्रा. डॉ. चेतना पाटील, प्रा. स्मिता स्वामी, प्रा. डॉ. जयप्रभा आसोरे, सुवर्णा वळसे पाटील, मनीषा ठाकरे यांची त्यांना सक्रिय साथ लाभली. वंचितांना एकत्रित करून ज्ञानदानाचे अनोखे कार्य त्या नेटाने पुढे नेत आहेत.

संस्थेद्वारे शैक्षणिक व सामाजिक दोन्ही प्रकारची कामे केली जातात. टोलेजंग इमले बांधणाऱ्या मजुरांची मुले नेरुळ, सानपाडा, खारघर, पनवेल, खांदेश्वर, मानसरोवर, जुईनगर, शिवाजीनगर येथील झोपपट्टय़ांमध्ये राहतात. त्या ठिकाणी जाऊन संस्थेचे कार्यकर्ते जोमाने कार्य करत आहेत. या मुलांना शिक्षण व आरोग्य अशा वेगवेगळ्या विषयांवर शिक्षण व प्रशिक्षण दिले जात आहे. सतत स्थलांतर करणाऱ्या मुलांनाही शिकवण्याचे काम संस्थेचे सदस्य करतात. बौद्धिकदृष्टय़ा सक्षम नसणाऱ्या मुलांनाही स्वावलंबनाचे धडे देण्याचा प्रयत्न संस्थेच्या वतीने केला जातो. त्यांना वेगळे अस्तित्व व ओळख निर्माण करून देण्यासाठी संस्थेचे सदस्य सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहेत.

संस्थेच्या माध्यमातून विशेष मुलांसाठी व शालाबाह्य़ मुलांसाठी उन्हाळी वर्ग, संस्कार वर्ग घेतले जातात. विविध शिबिरे, पथनाटय़े, व्याख्याने आयोजित करून जनजागृती केली जाते. विशेष बालकांसाठीच्या केंद्रात स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, रेमेडियल शिक्षण, सँड थेरपी, वॉटर थेरपी, योग, नृत्य, गायनाचे ज्ञान मुलांना दिले जाते. विशेष म्हणजे १६ वर्षांपुढील विशेष मुलांसाठी स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. खारघर येथे  तीन मजली इमारतीत हे समाजसेवेचे व्रत संस्था अनेक वर्षे करत आहे.

स्वमग्न जागृती आठवडय़ात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी संस्थेचा गौरव केला आहे. संस्थेच्या खारघर येथील केंद्रात ४७ विशेष बालके असून त्यांना तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्याचे काम संस्था करते. आजवर हजारो शालाबाह्य़ मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि तिथे त्यांनी तग धरावा यासाठी संस्थेने प्रयत्न केले आहेत.

विशेष मुलांसाठी केंद्र

खारघर सेक्टर २० येथे संस्थेने एस. एच. दिव्यांग केंद्र स्थापन केले आहे. या विशेष बालकांना शिक्षण, प्रशिक्षण व कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. आपणही इतरांप्रमाणे आनंदाने आणि स्वाभिमानाने जगू शकतो, हा आत्मविश्वास मुलांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न येथे केला जातो. या केंद्रात ४७ विशेष बालके असून त्यांना तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्याचे काम संस्था करते. विशेष मुलांबाबत असणारे गैरसमज व पालकांमध्येही असणारे न्यूनगंड दूर करण्यासाठी पालक व नागरिकांचेही प्रबोधन संस्थेद्वारे केले जाते. या विशेष मुलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्याचे काम संस्था करते.

santoshnjadhav7@gmail.com