तालुका पोलीस ठाण्यात परस्परांविरोधात गुन्हे दाखल

पनवेलमध्ये जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार सुरू होताच, वादविवाद आणि हाणामाऱ्यांनाही सुरुवात झाली आहे. नेरे येथील विहीघर गावातील फडके कुटुंबातील एका भावाने भाजपमध्ये तर दुसऱ्या भावाने शेकापमध्ये प्रवेश केला असून त्यांच्या समर्थकांत मंगळवारी रात्री मारामारी झाली. ही घटना वाजेपूर गावाजवळील रस्त्यावर घडली. त्यात सहा जण जखमी झाले असून एका गाडीचीही मोडतोड करण्यात आली आहे. दोन्ही गटांकडूनही परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

रायगड जिल्हापरिषद व पनवेल पंचायत समितीवर राजकीय सत्ता राखण्यासाठी निवडणूक होत आहे. शेकापचा विहीघर गावातील कार्यकर्ते पंढरीनाथ फडके यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे या परिसरात शेकापचे बळ कमी झाल्याचे चित्र आहे. पंढरीनाथ याच्यांवर खुनाचा गुन्हा दाखल आहेत. त्यांनी या परिसरातून निवडणूक लढवावी, अशी भाजपच्या बडय़ा नेतृत्वाची इच्छा होती. परंतु तसे झाले नाही. पंढरीनाथच्या पक्षप्रवेशानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांचे कट्टर समर्थक विलास फडके यांनी शेकापचा लाल बावटा हाती घेतला. शेकापने विलास यांना उमेदवारी दिली. याच वादाचे पर्यवसन मंगळवारच्या भांडणात झाले. कार्यकर्ते प्रचारासाठी ज्या कारमधून जात होते तिची मोडतोड करण्यात आल्याचे, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

भाजपचे नेते रामशेठ ठाकूर यांचे कट्टर समर्थक व नेरे परिसरातील कार्यकर्ते संजय पाटील व त्यांचा मुलगा राज पाटील यांच्यासह इतरांनी मारहाण केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. राज पाटील हे याच विभागातून निवडणूक लढवत आहेत. संजय पाटील यांच्या गटानेही विलास पाटील यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोन्ही गटांतील भांडणांमध्ये पोलिसांनी पारदर्शी तपास करावा यासाठी शेकाप व भाजपच्या बडय़ा नेत्यांनी आज तालुका पोलीस ठाण्यात हजेरी लावली होती.

आयुक्तांची बैठक

मंगळवारी पनवेलमध्ये निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बैठक घेतली. त्यांना सुरक्षेसंदर्भात खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. पोलीस उपायुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी पदभार स्वीकारताच हरिग्राम गावामधील सचदेव म्हात्रे व नितळस गावामधील शत्रुघ्न भोपी यांना तडीपार केले आहे. सचदेव याच्यावर मारहाण व जबरी चोरीसारखे पाच गुन्हे दाखल आहेत. तर शत्रुघ्न याच्यावर सोनसाखळी चोरीचे १५ गुन्हे दाखल आहेत. तडीपारीनंतरही हे दोनही आरोपी रायगड जिल्ह्य़ात दिसल्यास नवी मुंबई पोलिसांना कळविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.