महाड दुर्घटनेनंतर पालिकेकडून तपासणी; दोन इमारतींना तडे

पनवेल : महाड दुर्घटनाग्रस्त इमारत बांधलेल्या ‘कोहिनूर डेव्हलपर्स’च्या पनवेलमधील बांधकामांची पनवेल पालिकेने तपासणी सुरू केली आहे. तळोजातील दोन इमारतींना तडे गेलेले असून त्या धोकादायक असल्याच्या नोटिसा पालिकेने रहिवाशांना दिल्या आहेत. पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह ही पाहणी केली.

महाड येथील दुर्घटनेतील इमारत बांधणारे विकासक फारुक काझी यांच्या कोहिनूर डेव्हलपर्स या बांधकाम कंपनीने पनवेल परिसरात अनेक बांधकामे केली आहेत. तळोजा फेज एकमधील तारिक हेरिटेज, तारिक सफायर व तारिक पॅराडाईज या तीन  इमारती उभारल्या आहेत. या इमारतींची पाहणी पालिकेच्या पथकाने केली. यामध्ये तारिक हेरिटेज ही इमारत साधारणपणे १२ वर्षांपूर्वी बांधलेली असून इतर दोन इमारतींचे बांधकाम हे सहा वर्षांपूर्वीचे आहे. या दोन इमारतींना तडे गेले आहेत. यापैकी तारिक हेरिटेज या इमारतीची दुरुस्ती सुरू असली तरी इमारत धोकादायक असल्याचे समोर आले आहे. तळोजा व खारघर परिसराचे नियोजन प्राधिकरणाचे अधिकार सिडकोने स्वत:कडे राखून ठेवले असल्याने पालिकेने या इमारतींच्या बांधकामाचा तपशील सिडकोकडे मागविला आहे. या इमारतीं धोकादायक असल्याचे प्रथमदर्शनी समोर आल्याने धोकादायक इमारत असल्याच्या नोटिसा प्रभाग अधिकाऱ्यांनी रहिवाशांना बजावल्या आहेत. तातडीने बांधकामांचे स्थापत्यविषयक परीक्षण करून प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले आहे.

इमारतींची सद्य:स्थिती

तारीक हेरिटेज : सेक्टर १०, प्लॉट नंबर १९, एकूण १२ सदनिका असून ११ सदनिकांमध्ये रहिवाशी वास्तव्यास आहेत. १२ वर्षांपूर्वीचे बांधकाम असून  इमारतीला तडे गेले आहेत. छतावरून पाणी घरात पाझरत आहे. उदवाहकात पाणी गेल्याने ते बंद आहे.

तारीक पॅरेडाईज : सेक्टर २, प्लॉट नंबर २५ येथे ही चार मजली इमारत असून १६ सदनिका आहेत. यामध्ये १५ सदनिकांमध्ये रहिवाशी वास्तव्यास आहेत. सहा वर्षांपूर्वीचे बांधकाम असून इमारतींच्या भिंतींना तडे गेलेले आहेत.  पाण्याच्या टाकीलाही तडे गेले असून धोकादायक स्थितीमुळे चौथा मजला बंद आहे.

तारीक सफायर : सेक्टर २ मधील प्लॉट क्रमांक २६ वर ही इमारत आहे. १६ सदनिकांपैकी १३ सदनिकांमध्ये रहिवाशी वास्तव्यास आहेत. सहा वर्षांपूर्वीचे बांधकाम असून इमारतीची स्थिती राहण्यायोग्य आहे. सेक्टर  येथे बांधकाम सुरू असलेल्या अवस्थेत इमारत आहे.

निर्माणधारी इमारतीतही फेरफार

तळोजात सेक्टर दोन येथील भूखंड क्रमांक १८१ वर ‘कोहिनूर डेव्हलपर्स’च्या एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. रस्त्याच्या बाजूला दुकानांसाठी गाळे काढण्यात आलेले आहेत. यासाठी तिन्ही गाळ्यांच्या मध्य भागावरील तीन कॉलम कापून हे गाळे निर्माण करण्यात आले आहेत. यााबाबत पालिकेने सिडकोच्या बांधकाम व नियोजन विभागाला या प्रकाराबाबत कळविले आहे. इतर बांधकामांबाबत काही तक्रारी असल्यास पालिकेकडे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.