राज्यात गोहत्येला बंदी असतानासुद्धा पनवेल तालुक्यामधील तळोजा गावामध्ये सुरू असणारा अवैध गोहत्येचा कत्तलखाना प्राणिमित्राने पोलिसांच्या मदतीने उघडकीस आणला आहे. पोलिसांच्या कारवाईची चाहूल लागताच कत्तलखाना चालविणारे समाजकंटक कुटुंबासहित पसार झाले असून या प्रकरणी पोलिसांनी ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
रविवारी पहाटे प्राणिमित्र शर्मा यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी पहाटे साडेचार वाजता ही कारवाई केली. तळोजा गावात दूर अंतरावर सजीर अहमद अब्दुल कादीर पटेल याच्या घरातील तळघरात हा कत्तलखाना सुरू होता. तळघरातून एक रस्ता काढण्यात आला आहे. तेथे पत्र्यांची शेड बनविण्यात आली होती तेथे पोलिसांनी धडक दिली असता गाईंची कत्तल करण्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तालुक्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष दळवी आणि नवी मुंबई महानगरपालिकेची पशुवैद्यकीय अधिकारी वैभव झुंजारे यांच्या मदतीने या कत्तलखान्यातील मृत जनावरांच्या अवयवांचा पंचनामा केला. या जनावरांचे अवयव कालिना येथील वैज्ञानिक वैद्यकीय प्रयोगशाळेत पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी दिली. या घटनेनंतर सजीर पटेल हा कुटुंबासोबत गावातून पळाला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी सजीरसह रफिक युनूस मिया, मुजाहिद्दीन मुल्ला, समिल कुरेशी ऊर्फ डबल भेजा, शफीक कुरेशी, लतिफ कुरेशी, मोसीन कादर शहा, जिलान कादर शहा, हजमा सय्यद, सलमान सगीर पटेल, इलियाज अशांविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणासही अटक केलेली नाही. तालुक्यातील सिडको वसाहतींमध्ये फिरणाऱ्या बेवारस जनावरांना पकडून टेम्पोमध्ये भरून त्यांना सजीर पटेल याच्या कत्तलखान्यावर रात्रीच्या काळोखात आणले जायचे. त्यानंतर या कत्तलखान्यात रात्रीच्याच वेळी कत्तल करून त्याचे लहान तुकडे करून हे मांस विक्री केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. हा बेकायदा धंदा अनेक वर्षांपासून तळोजात सुरू आहे. परिसरात या धंद्याविरोधात कोणीही बोलत नाही, प्राणिमित्र शर्मा यांच्यामुळे ही घटना उघडकीस आली आहे.