१५० कोटींची निविदा; महत्त्वाच्या ठिकाणी आणखी १४५२ आधुनिक यंत्रणा

नवी मुंबई</strong> : महापालिका प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण १४५२ ‘सीसीटीव्हीं’चा रखडलेला प्रस्ताव पूर्णत्वाकडे नेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी नव्याने १५० कोटींची निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली. यामुळे महत्त्वाच्या ठिकाणी आता हे कॅमेरे बसविले जाणार आहेत.

शहरात पालिकेच्या माध्यमातून २०१२ पासून २८२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अनेक गुन्हे उघडकीस येण्यास याची मदत झाली आहे. मात्र हे कॅमेरे आता कालबा होत आहेत. त्यामुळे नव्याने १४५२ नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव पालिकेने वर्षभरापूर्वीच मंजूर केला होता. त्यासाठी स्वारस्य अभिव्यक्ती सूचना मागविण्यात आल्या होत्या. यात ३५ जण सहभागी झाले होते. त्यातील पाच जणांची निवडही करण्यात आली होती. परंतु आता पालिका आयुक्तांनी बदलत्या तंत्रज्ञानामुळे थेट निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापूर्वी राबविलेली स्वारस अभिव्यक्ती प्रक्रियाच रद्द करण्यात आली आहे.

या यंत्रणेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबरच शहरात येणाऱ्या वाहनांची माहितीही ठेवली जाणार आहे. शहरातील प्रवेशद्वार असलेली ऐरोली, मुलुंड उड्डाणपूल, ठाणे-दिघा रोड, शिळफाटा जंक्शन, वाशी टोल नाका, बेलापूर किल्ले गावठाण व बेलपाडा या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी कॅमेरे लावण्यात येणार आहेत. हे कॅमेरे हे हाय डेफिनेशन फिक्स व हायस्पीड असल्याने त्यांची शहरातील हालचालींवर बारीक नजर राहणार आहे. शहरातील २७ मुख्य चौकांसाठी १०८ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे सर्व बसडेपो, मार्केट, उद्याने, मैदाने, पालिका विभाग कार्यालये, वर्दळीची ठिकाणे, चौक ,नाके आदी सर्व ठिकाणी आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कक्षेत येणार आहेत. पामबीच मार्ग, ठाणे-बेलापूर रोड, पालिका हद्दीतील शीव-पनवेल रोड येथे हायस्पीड कॅमेरे लावण्यात येणार आहेत. तसेच शहरातील ४३ ठिकाणी पॅनिक अलार्म व कॉलबॉक्सचीही व्यवस्था असणार आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या मागणीनुसार देशविघातक व घातपाती कृत्यावर लक्ष ठेवण्यासाठी खाडी व समुद्र किनारे असलेल्या ९ ठिकाणी थर्मल कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. आठ ठिकाणी स्थानिक नियंत्रण कक्षासह पालिका मुख्यालयात केंद्रीय नियंत्रण कक्ष पोलीस आयुक्तालय यांच्याशी जोडण्यात येणार आहे. याची माहिती केंद्र पोलीस मुख्यालयात असणार असून ३० दिवसांची माहिती मिळू शकेल.

कॅमेऱ्यांचे प्रकार व ठिकाणे

’ हाय डेफिनेशन : ९५४

’ पीटीझेड : ३९६

’ वाहनांची गती, देखरेखीसाठी : ८०

’ पॅनिक अलार्म व कॉल बॉक्स सुविधा ठिकाणे  : ४३

’ खाडी व समुद्र किनारे थर्मल कॅमेरे : ९

’ सार्वजनिक ठिकाणे  : १२६

’ डायनामिक मेसेजिंग साईनचा वापर :  ५९

सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी १५४ कोटी ३४ लाख खर्चाच्या प्रस्तावाला यापूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे. स्वारस्य अभिव्यक्ती सूचना मागवण्यात आल्या होत्या. ती प्रक्रिया आता रद्द केली आहे.  या कामाची लवकरच निविदा प्रसिद्ध होईल.

– अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, महापालिका