उरणच्या शहरी भागांसह ग्रामीण भागांतही सोनसाखळी चोरांचा वावर वाढला आहे. गतवर्षी उरणमध्ये १५ पेक्षा अधिक सोनसाखळी चोऱ्या झाल्या. त्यापैकी १० चोऱ्यांचा छडा लागला आहे. तर यंदा अशा घटना घडलेल्या नाहीत. यात शहरात आनंद नगर, स्वामी विवेकानंद चौक आदी ठिकाणी तर ग्रामीण भागात चिरनेर दिघोडे मार्गावर अशा घटना वाढू लागल्या आहेत. शहरात बँकेतून पैसे काढून बाहेर पडणाऱ्यांवर डोळा ठेवून पैसे लांबवले जात आहेत. त्यासाठी चोर विविध क्लृप्त्या लढवत आहेत.

दुपारी रस्त्यातील वर्दळ कमी असताना एकटय़ा-दुकटय़ा महिलेला गाठून तिच्या गळ्याला हिसका देऊन सोनसाखळ्या चोरण्यात येत आहेत. सोनसाखळी चोरल्यानंतर चोरटे दुचाकीवरून पसार होतात. उरणला नवी मुंबई, पेण, पनवेल आदी ठिकाणांना जोडणाऱ्या चिरनेर पनवेल मार्गावर, बस स्थानकात उभ्या असलेल्या तसेच रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरण्याच्या घटना घडल्या आहेत. यात एक महिला जखमीही झाली होती.

चिरनेरमधील एका दुकानातील सीसीटीव्हीमध्ये चोरटा कैदही झाला होता. बँकेतून पैसे काढून रस्त्यावरून जात असताना अंगावर पाणी टाकणे, कचरा टाकणे आणि कपडे साफ करण्यास मदत करण्याच्या बहाण्याने पैशांची पिशवी लांबविण्याचे प्रकार घडले आहेत. शहरातील लोकसंख्या दिवसागणिक वाढत असताना वाढत्या गर्दीचा गैरफायदा घेत चोऱ्या केल्या जात आहेत.