शेखर हंप्रस

नवी मुंबईत पाच महिन्यांत सहा प्रकरणात गुन्हे

विदेशात तसेच सरकारी नोकरी लावतो म्हणून फसवणुकीची प्रकार नवी मुंबईतून अलीकडे वाढले आहेत. या वर्षांत जानेवारीपासून पाच महिन्यांत अशा प्रकारे फसवणुकीचे सहा प्रकार समोर आले असून यातील एकही प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे बेरोजगारांची फसवणूक रोखणे पोलिसांपुढे आव्हान ठरणार आहे.

वाढत्या बेरोजगारीमुळे कामगार ते उच्चशिक्षित तरुण पर्याय नसल्याने विदेशातही मिळेल ती नोकरी करण्यास तयार होत आहेत. या मानसिकतेचा फायदा काही भामटे घेत असून बोगस कंपन्यांची कार्यालये तयार करून तरुणांची लूट करीत परागंदा होत आहेत. नवी मुंबईत सरासरी महिन्याला एक, दोन प्रकार घडत आहेत.

विदेशात नोकरी लावण्याच्या जाहिराती करून मोक्याच्या ठिकाणी अलिशान कार्यालय थाटले जाते. सव्‍‌र्हिस वा प्रोसेस फीच्या नावाखाली लाखो रुपये जमा केले जातात. नियुक्ती पत्र देत ठरावीक वेळी विदेशात जाण्यासाठी बोलावले जाते. बेरोजगार ठरलेल्या वेळी येतो तेव्हा कार्यालयाला कुलूप असते. संबंधित देशाच्या दूतावासाकडे चौकशी केली असता व्हिसा बनावट असल्याचे समजते आणि बेराजगार तरुणावर संकट कोसळते.

नवी मुंबईत जानेवारी ते मेदरम्यान सहा ठिकाणी विदेशात नोकरी लावतो म्हणून फसवणूक प्रकरणी गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यातील मोठी फसवणूक कोपरखैरणेत समोर आली असून यात ६९ बेरोजगारांची फसवणूक झाली आहे. ज्यात पश्चिम बंगालचेच २४ जण आहेत. या प्रकरणात समीर खान, शबाना सरदार, जयेश गोगरी आणि शाकीर शेख यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुलाम अन्सारी आणि अब्दुल मंडोल हे मध्यस्थीही अडकले असून ४० हजार ते २ लाखांपर्यंतची रक्कम एकाकडून घेण्यात आली आहे.

कोल्हापूर येथील शिवराज घोटणे याला विदेशात नोकरी लावतो म्हणून २ लाख उकळले गेले मात्र नौकरी न मिळाल्याने या बाबत ३ एप्रिलला खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. उलवे परिसरात राहणाऱ्या दाम्पत्याला रबाळेतील सुनील कुटे या आरोपीने मुंबई पालिकेत पाणीपुरवठा विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखऊन २ लाख रुपये घेतले. मात्र नोकरी न मिळाल्याने सदर दाम्पत्याने रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. गेल्या वर्षी सर्वात मोठा फसवणुकीचा प्रकार कोपरखैराणेत समोर आला होता.

या प्रकरणातील संशयित आरोपी साजिद बशीर, माजिद शेख, अमितकुमार आणि अवंतिका ऊर्फ आशा धोडजी यांचा अद्याप शोध लागला नसून या चौकडीने विदेशात नौकरी लावतो म्हणून ३०० पेक्षा जास्त लोकांची फसवणूक केली आहे.

असे प्रकार वारंवार घडत असून फक्त गुन्हे नोंद होतात, मात्र या प्रकरणांचा तपास लागत नाही.

नोकरीच्या ठिकाणीही फसवणूक

पैसे घेऊन नोकरीच्या ठिकाणी गेल्यावर फसवणुकीचा एक प्रकारही समोर आला आहे. यात तेलंगाना येथे राहणारा निजामोद्दीन खान याने सानपाडा येथील लियो एजन्सीद्वारे आखाती देशात सुरक्षा रक्षकाची नोकरी मिळवली, मात्र करारपत्रानुसार कुठल्याही सोयी व पगार मिळत नव्हता. त्याची फसवणूक झाल्यानंतर त्याने नवी मुंबई पोलिसांच्या टय़ुटर अकाऊंटवर आपली व्यथा मांडली मात्र तुम्ही तेलंगणात जाऊन गुन्हा नोंद करा, असा सल्ला त्याला देण्यात आला. प्रसिद्धीमाध्यमांनी याची दखल घेतल्यानंतर अखेर त्या एजन्सी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक प्रकारात पोलीस योग्य कारवाई करीत आहेत. या गुन्हे प्रकरणांबाबत आम्ही गंभीर असून याबाबत जनजागृतीबरोबर गुन्हेगारांना जेरबंद करणे अशा उपाययोजना करीत आहोत.

-संजीव कुमार, पोलीस आयुक्त नवी मुंबई.