विसर्जनानंतर उद्यानांमधील तलावांची सुरक्षा वाऱ्यावर

नवी मुंबई : करोनाकाळात नवी मुंबई पालिकेच्या वतीने शहरातील मैदानांमध्ये कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत. रविवारी या तलावांमध्ये दीड दिवसांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर काही तलावांत लहान मुले पोहण्यासाठी उतरल्याने या तलावांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तलावाच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा नसल्याने तसेच कोणालाही मज्जाव करण्यात न आल्याने अपघातांची भीती व्यक्त केली जात आहे.

२३ सार्वजनिक विसर्जन स्थळांवर गर्दी होऊ  नये यासाठी पालिकेने १३५ कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. यंदा दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करणयात आले. मात्र त्यानंतर तलावांभोवती लहानग्यांनी गर्दी केली, तर काही जण थेट कृत्रिम तलावात उतरून पोहू लागले. शिरवणे गावातील नानासाहेब कला संकुलासमोरील मैदानात कृत्रिम तलाव उभारला आहे. मात्र त्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्यात आलेला नाही. त्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तलावांत पोहणाऱ्या मुलांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विसर्जनासाठी उभारलेल्या कृत्रिम तलावाभोवती संरक्षक व्यवस्था उभारणे गरजेचे आहे किंवा त्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मात्र याबाबत पालिकेच्या वतीने अद्याप कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही.