भाजीमंडईसह २०० झोपडय़ांवर हातोडा

सिडकोने शहरातील बेकायदा धार्मिक स्थळांपाठोपाठ बेलापूरमधील कोकण भवन जवळील भूखंडावर असलेले फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि टाटानगर झोपडपट्टीवरही धडक कारवाई केली. मंगळवारी दिवसभर सुरू असलेल्या या कारवाईत मोठय़ा प्रमाणात झोपडय़ा हटवून कोकण भवन जवळील भूखंड रिकामा करण्यात आला. सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या सहाय्यक नियंत्रकांनी ही माहिती दिली.

नवी मुंबई परिसरात मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. सिडकोने बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाईही सुरू केली आहे. मंगळवारी सिडकोच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख शिवाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिक्रमण नियंत्रक बी. बी. राजपूत आणि सहायक नियंत्रक गणेश झिले यांच्या पुढाकाराने बेलापूरमधील कोकणभवन परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. कोकणभवनच्या बाजूलाच असलेल्या भूखंडावर भाजीविक्रेत्यांनी अतिक्रमण केले असून याच परिसरात बेकायदा उभारण्यात आलेले दोन गाळे कारवाईत जमीनदोस्त करण्यात आले. भाजीविक्रेते व अन्य फेरीवाल्यांवर तसेच बेकायदा पार्किंगवर कारवाई करत हा भूखंड मोकळा करण्यात आला.

टाटानगर परिसरात मोठय़ा प्रमाणात बेकायदा झोपडय़ा होत्या. त्यापैकी २०० बेकायदा झोपडय़ा जमीनदोस्त करण्यात आल्या. २ पोकलेन, २ जेसीबी आणि ४० मजुरांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी बेलापूर पोलीस ठाण्याचा मोठा फौजफाटा तैनात होता. याबाबत सिडकोचे जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांना विचारले असता सिडकोची कारवाई शहरात सुरू असून सातत्याने बेकायदा बांधकिामावार कारवाई करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

ये रे माझ्या मागल्या

कोकणभवन शेजारील भूखंडावरील अतिक्रमणांवर पालिका वारंवार कारवाई करते. टाटानगर झोपडपट्टीतील झोपडय़ांवरही पालिकेने तिसऱ्यांदा कारवाई केली आहे. आज सिडकोनेही याच ठिकाणी कारवाई केली. वारंवार कारवाई करूनही पुन्हा झोपडय़ा व फेरीवाले बसत आहेत. त्यामुळे कारवाईवरील पालिका व सिडकोचा खर्च वारंवार वाया जात आहे.

मंगळवारी झालेल्या कारवाईत कोकणभवन समोरील भाजीविक्रेते बसतात त्या भूखंडावरील अतिक्रमण हटविण्यात आले. दोन बेकायदा गाळ्यांवरही कारवाई करण्यात आली. टाटानगरमधील २०० झोपडय़ाही हटवण्यात आल्या.

गणेश झिने, सहायक नियंत्रक अतिक्रमण विभाग, सिडको