मागील आठवडय़ात सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी लोकेश चंद्र यांनी स्वीकारली आहे. सिडको आता पन्नाशीकडे वाटचाल करत आहे. शहर वसविण्याचा वसा घेतलेल्या सिडकोचे नवी मुंबईतील कार्य तसे संपलेले आहे. नागरी सेवा देण्याच्या जबाबदारीतून सिडको हळूहळू मुक्त होत आहे. नवी मुंबई व पनवेल पालिका स्थापन झाल्यामुळे दैनंदिन कामकाजातून सिडकोला मोकळीक मिळाली आहे. याच वेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, नैना आणि कॉर्पोरेट पार्क यासारखे आंतरराष्ट्रीय प्रकल्प सिडकोने हाती घेतले असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या परिसराकडे लागले आहे. मुंबई विमानतळावरील हवाई प्रवासी वाहतुकीचा ताण वाढत चालला आहे. नवी मुंबई विमानतळाची गरज लवकरच भासणार आहे. या विमानतळावरून पहिले उड्डाण वेळेत होईल, याची काळजी घेण्याची जबाबदारी नवीन व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्यावर आहे.

सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी प्रकल्पग्रस्तांची जमीन संपादनाची प्रक्रिया पार पाडली तर भूषण गगराणी यांनी निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली. त्यामुळे लोकेश चंद्र यांच्यावर विमानतळावरील उड्डाणाची मुदत सांभाळण्याची जबाबदारी आहे. राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन यांनी रविवारी या प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पाचे महत्त्व अधोरिखित केले आहे. पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच सिडकोच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला भेट देणारे जैन हे पहिलेच मुख्य सचिव आहेत. त्यामुळे लोकेश चंद्र यांनाही हा प्रकल्प किती महत्त्वाचा आहे, याची जाणीव झाली असावी.

या प्रकल्पात सध्या स्थलांतराचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. पाऊस कोणत्याही क्षणी पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर जूनच्या पहिल्या आठवडय़ाची वाट न पाहता लवकर होणे आवश्यक आहे. प्रकल्पग्रस्तांनी लवकर स्थलांतर करावे यासाठी त्यांना प्रोत्साहन भत्तादेखील देण्यात आला आहे, पण त्याला प्रकल्पग्रस्तांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे लोकेश चंद्र यांची या ठिकाणी कसोटी लागणार आहे. हे सर्व प्रकल्पग्रस्त स्थलांतरित झाल्यानंतर ही सर्व जमीन मुख्य निविदाकार जीव्हीके या कंपनीला हस्तांतरित केली जाणार आहे. याच वेळी सिडकोच्या अखत्यारित असलेली विमानतळपूर्व कामेदेखील पूर्ण करून द्यावी लागणार आहेत.

यापूर्वीच्या व्यवस्थापकीय संचालकांवर जमिनीची मशागत करण्याची जबाबदारी होती, पण प्रत्यक्षात पीक घेण्याचे काम आता लोकेश चंद्र यांना करावे लागणार आहे. यासाठी प्रकल्पग्रस्त व त्यांच्या नेत्यांशी सुसंवाद साधूनच हे प्रश्न कौशल्याने सोडवावे लागणार आहेत. विमानाचे टेक ऑफ सुरळीत होत नाही तोपर्यंत सिडकोत येणाऱ्या प्रत्येक व्यवस्थापकीय संचालकाची पहिली जबाबदारी विमानतळ हीच राहणार आहे. या प्रकल्पासाठी आता नवीन कंपनी स्थापन करण्यात आली आहे. त्यात सिडकोची २६ टक्के भागीदारी आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास नेणे हे सिडकोसमोर मोठे आव्हान आहे. प्रकल्प मुदतीत पूर्ण न झाल्यास त्याचा फटका मुख्य निविदाकरांना बसण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी कोटय़वधींचे कर्ज या निविदाकरांनी उभारले आहे.

नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्र अर्थात नैना या क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सिडकोकडे आहे. या प्रकल्पात सिडको जमीन संपादन करणार नाही, पण शेतकऱ्यांना वाढीव एफएसआय देऊन या ठिकाणी तिसरी नवी मुंबई उभी केली जाणार आहे. त्यातील पहिल्या टप्यातील २३ गावांचा एक विकास आराखडा तयार केला गेला आहे, पण सुविधांच्या नावाने या ठिकाणी शिमगा आहे. या चार प्रकल्पांबरोबरच गृहनिर्मितीचा मोठा प्रकल्प सिडकोला येत्या काळात पूर्ण करावा लागणार असून सिडको स्थापनेमागील उद्देश सफल करावा लागणार आहे. सिडकोने स्वस्त आणि परवडणारी घरे उभी केल्यास या भागात निर्माण झालेली कृत्रिम दरवाढ जमिनीवर येणार आहे. सिडकोची स्थापनाच मुळात घरे बांधण्यासाठी झाली आहे, पण त्यापासून सिडको खूप दूर असल्याचे दिसते. सिडकोत आतापर्यंत ३० पेक्षा जास्त व्यवस्थापकीय संचालकांनी पदभार सांभाळला आहे. त्यात प्रत्येकाने आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे. नवीन व्यवस्थापकीय संचालकांसमोर हे एक आव्हान आहे.

मेट्रो आणि कॉर्पोरेट पार्क

* या प्रकल्पाबरोबरच नवी मुंबईची धमनी ठरणाऱ्या बेलापूर ते पेंदार या ११ किलोमीटर अंतराच्या पहिल्या मेट्रो मार्गाची सुरुवात याच वर्षी करावी लागणार आहे. कंत्राटदारांच्या हलगर्जीमुळे हा प्रकल्पही तीन वर्षे रखडला आहे. शहराला मेट्रोची इतकी गरज नसल्याने त्याची इतकी वाच्यता झाली नाही, पण तळोजा आणि नंतर कल्याणपर्यंत विस्तारित करण्यात येणारा हा प्रकल्पदेखील विमानतळाएवढाच महत्त्वाचा आहे.

*  ऐरोली येथील आंतरराष्ट्रीय दूतावास प्रकल्प सिडकोने एका अर्थाने गुंडाळल्याने खारघर येथे बीकेसीच्या धर्तीवर खारघर कॉर्पोरेट पार्कचा एक आराखडा आंतरराष्ट्रीय वास्तुविशारदांच्या संकल्पनेतून साकार होत आहे.

vikas.mahadik@expressindia.com