धार्मिक स्थळांवरील कारवाईतील दिरंगाईचा अहवाल पालिका पाठवणार

खारघर, कामोठे परिसरातील बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे नाटक करणाऱ्या सिडकोच्या बेकायदा बांधकाम नियंत्रण पथकाने नवी मुंबईतील शेकडो बेकायदा धार्मिक स्थळांवर अद्याप कारवाई केलेली नाही. राज्य शासन व मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यासाठी १७ नोव्हेंबपर्यंत अतिंम मुदत असताना साडेचारशेपेक्षा जास्त बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई होणे आता अशक्य असल्यामुळे याबाबतचा एक अहवाल पालिका राज्य शासनाला देणार आहे.

राज्यातील सर्व बेकायदा धार्मिक स्थळांवर १७ नोव्हेंबरपूर्वी कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यासाठी या धार्मिक स्थळांची अ, ब, क अशी वर्गवारी करण्यात आली आहे. यात स्थलांतरित करणे, निष्काषित करणे आणि कायम करणे असे निकष लावण्यात आलेले आहेत. नवी मुंबई पालिकेचे आयुक्त एन, रामास्वामी यांनी घेतलेल्या तीन बैठकीत स्थानिक प्राधिकरणांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नवी मुंबईत असलेल्या ५०१ बेकायदा धार्मिक स्थळांची एक यादी तयार केली आहे. यात सर्वाधिक एमआयडीसी व सिडकोच्या कार्यक्षेत्रात बेकायदा धार्मिक स्थळे आहेत. एमआयडीसी पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याच्या सबबीखाली कारवाई करत नाही तर सिडकोने बोटावर मोजण्याइतक्या बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई आतापर्यंत केली आहे. पालिका आयुक्तांनी वेळोवेळी सूचना देऊनही सिडको त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे नऊ दिवस शिल्लक राहिले असताना शेकडो बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई होणार कशी? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

सिडकोने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व बेकायेदशीर धार्मिक स्थळांवर कारवाई करावी, यासाठी अनेक वेळा सूचना व मुदत देण्यात आलेली आहे. पालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील १७ बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई केलेली आहे. सिडकोच्या या दिरंगाईची वस्तुनिष्ठ अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे.

अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई पालिका.