पनवेल स्थानक परिसरात नागरिकांची गैरसोय; महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

सीमा भोईर, पनवेल</strong>

पनवेल रेल्वेस्थानक परिसरातील बेकायदा दुकानांवरील पालिकेने केलेली कारवाई तात्पुरती ठरली आहे. पनवेल महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाची पाठ फिरताच दुकानांच्या रांगा नव्याने उभ्या राहण्यास सुरुवात झाली आहे. स्थानक परिसरात तोडलेले गाळे जोमात उभे केले जात आहेत. याविरोधात नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पनवेल शहरात वर्षभरापूर्वी स्वच्छता अभियान जोरदार पद्धतीने सुरू होते. त्यामुळे बेकायदा बांधकामे, फेरीवाल्यांचा बंदोबस्त करण्यात आला होता. सातत्याने कारवाई केली जात होती. मात्र स्थानक परिसरातील काही दिवसांपूर्वी करण्यात आलेली कारवाई संपल्यानंतर मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यांवर बेकायदा फेरीवाले आणि दुकाने नव्याने उभी केली जात आहेत. त्यामुळे पालिकेच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेला अपयश आल्याची चर्चा रंगली आहे. पनवेल स्थानक परिसरात पालिका अधिकारी आणि कर्मचारी यांचे सध्या दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. बेकायदा दुकाने जमीनदोस्त केल्यानंतर दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही बांधकाम पाडल्याचे ढिगारे उचलले गेलेले नाहीत. ही स्थिती तशीच कायम असताना येथील भूमाफियांनी बेकायदा दुकाने नव्याने बांधण्यास सुरुवात केली आहे. यातील काही दुकाने भाडय़ानेही देण्यात आली आहेत. दुकानात रेल्वेच्या तिकिटांची विक्री सुरू आहे. काही दुकानांत तंबाखू , विडय़ा आणि गुटख्याची विक्री केली जात आहे.

संबंधित बांधकामे साधारण वर्षभरापूर्वी अनधिकृत असल्याने पालिकेच्या माध्यमातून तोडली गेली होती, त्यानंतर न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली. यादरम्यान बांधकामे पाडणे आणि बांधणे या गोष्टीसाठी बंदी असतानाही नव्याने बेकायदा बांधकामे उभारली जात आहेत. ही गोष्ट न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली जाईल.

– जमीर लेंगरेकर, उपायुक्त पनवेल महानगरपालिका

कारवाई केल्यावर दोन दिवस सगळं शांत होत त्यांनंतर आधी कापड मग पत्रे टाकून त्यानंतर पक्की बेकायदा दुकाने उभारली जात आहेत. यामुळे नागरिकांसाठी पदपथही शिल्लक राहिलेले नाहीत.

– संजय शेटय़े, रहिवासी पनवेल