पोलिसांकडून बळाचा वापर टाळण्यासाठी पालिकेचा निर्णय

नवी मुंबई</strong> : पालिका हद्दीत दिवसेदिवस वाढणारी करोना रुग्णसंख्या लक्षात घेता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पालिकेने सोमवारपासून सात दिवस विशेष टाळेबंदी जाहीर केली आहे. लोकसहभागातून कोपरखैरणे उपनगरात राबविण्यात येत असलेली टाळेबंदी टप्याटप्याने संपूर्ण शहरात राबविणार असल्याचे पालिकेने जाहीर केले आहे.

गेले साडेतीन महिने २४ तास बंदोबस्तात गुंतलेल्या पोलिसांच्या कमकरतेमुळे शहरात टप्याटप्याने ही टाळेबंदी राबविण्यात येणार आहे. सध्या १२ ठिकाणी लागू करण्यात आलेली टाळेबंदी आवश्यकता भासल्यास संपूर्ण शहरात लागू केली जाईल असा इशारा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिला आहे.

नवी मुंबई पालिकेने बेलापूर, करावे, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, चिंचपाडा येथील बारा प्रतिबंधित क्षेत्रात सोमवार पासून टाळेबंदी जाहीर केली आहे. पालिकेने जाहीर केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात पुरेसा पोलिस बंदोबंस्त नसल्याने काही ठिकाणी या टाळेबंदीचा फज्जा उडाल्याचे चित्र होते. गेली तीन महिने सातत्याने पोलिस बंदोबस्तात व्यग्र असल्याने पालिकेने टप्याटप्याने टाळेबंदी जाहीर करावी असे पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पालिकेने जाहीर केलेल्या ४४ प्रतिबंधित क्षेत्रांपैकी सोमवार पासून केवळ १२ ठिकाणी ही टाळेबंदी लागू केली आहे.

कोपरखैरणे गाव आणि आजूबाजूच्या परिसरात राजकीय पक्ष, सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने ही जनता टाळेबंदी आहे. त्याला चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे यापुढे पोलिसांपेक्षा स्थानिक नागरीकांच्या सहकार्यानेच ही जनता टाळेबंदी राबवली जाणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या टाळेबंदीनंतरही रुग्णसंख्या आटोक्यात न आल्यास सात दिवसानंतर ही टाळेबंदी अधिक वाढवण्याची शक्यताही पालिका आयुक्तांनी व्यक्त केली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात घरोघरी जाऊन समूह तपासणी केली जाणार आहे. या अगोदर कोणत्याही प्रकारचे आजार असलेल्या रुग्ण व ज्येष्ठ नागरीक, गर्भवतींची विशेष काळजी घेतली जाणार असल्याचे आयुक्तांनी जाहीर केले आहे.

कोपरखैरणेत लोकसहभाग

नवी मुंबईत कोपरखैरणे, तुर्भे व ऐरोली ही उपनगरे करोना रुग्णसंख्येच्या दृष्टीने अतिसंक्रमित झाली आहेत. टाळेबंदी शिथिल करण्यात आल्याने नागरिकांची रहदारी वाढल्याचे दिसून येत आहे. गेले साडेतीन महिने पोलिस बंदोबस्त गुंतलेल्या पोलिसांची शारीरिक आणि मानसिक स्थिती बिघडली आहे. त्यामुळे आता पोलिस बंदोबस्ताची जबाबदारी गाव आणि नोडमधील राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देऊन पूर्ण केली जाणार आहे. कोपरखैरणे भागात सोमवारपासून हा लोकसहभाग दिसून आला असून अशाच प्रकारे इतर नोडमध्ये लोकांच्या सहकार्याने टाळेबंदी राबवली जाणार आहे.