News Flash

नवी मुंबई, पनवेलमध्ये करोना मृत्यूंची चिंता

रुग्णसंख्या नियंत्रणात मात्र मृत्यूंमध्ये वाढ; अतिदक्षता खाटांच्या मागणीत घट

रुग्णसंख्या नियंत्रणात मात्र मृत्यूंमध्ये वाढ; अतिदक्षता खाटांच्या मागणीत घट

नवी मुंबई : एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ापासून वाढू लागलेली करोनाबाधित रुग्णांची संख्या मे महिन्याच्या सुरुवातीस कमी होत असल्याने दिलासा मिळाला आहे, मात्र मृत्युदर वाढत असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. रुग्णसंख्या सरासरी तीनशेच्या घरात असताना मृत्यू दहा ते बारा होत असल्याने चर्चा करण्यात आली.

अत्यवस्थ रुग्णांची संख्या आजही जास्त असल्याने हा मृत्युदर जास्त असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तसेच करोना विषाणूचे उत्परिवर्तन हे या वाढत्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे गेली एक महिना अत्यवस्थ रुग्णांसाठी खासगी व पालिका रुग्णालयात रुग्णशय्यांची मागणी मंगळवारी रात्री शून्य नोंदविण्यात आली आहे.

नवी मुंबईत फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात रुग्ण पुन्हा आढळून येऊ लागले होते. मार्चच्या दुसऱ्या आठवडय़ात ही संख्या १३६ रुग्ण होती. एप्रिलच्या माध्यान्हापर्यंत ही संख्या थेट १४५४ पर्यंत गेलेली होती. त्या वेळीही मृत्युदर कमी होते मात्र एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात ही संख्या ९०० ते १२०० दरम्यान असताना मृत्युदर हे सहा ते आठ दरम्यान होते. एप्रिलच्या ३० नंतर संख्या कमी आणि मृत्युदर जास्त असे चित्र असल्याचे दिसून आले आहे.

या संदर्भात पालिकेचा आरोग्य विभाग आणि टास्क फोर्स मध्ये गंभीर चर्चा झाल्याचे समजते. करोना रुग्णांची संख्या वाढली तरी चालेल पण रुग्णांचा मृत्यू होता कामा नये असे स्पष्ट मत पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केले आहे. मात्र रुग्णसंख्या सरासरी तीनशे असताना मृत्यू दहा ते बारा होऊ लागले आहेत. मागील एक महिन्यात शेवटच्या क्षणी अत्यवस्थ झालेले रुग्ण अजून उपचार घेत असून त्यातील काही रुग्ण दगावण्याची घटना घडत आहे. यात तरुणांचादेखील समावेश असून प्राणवायू पातळी झपाटय़ाने ६० ते ६५ मिलिमीटपर्यंत खाली येत असल्याने रुग्णांचा मृत्यू ओढवत आहे. मृत्युदर रोखण्याचा पालिका व खासगी रुग्णालयात आटोकाट प्रयत्न केला जात असून मृत्यूंची संख्या आठ दिवसांत कमी होईल असा आशावाद व्यक्त करण्यात आली आहे.

सहाशे अत्यवस्थ रुग्णशय्या व्यापून गेलेल्या आहेत. पालिकेने शहरातील रुग्णांसाठी हेल्पलाइन व कॉल सेंटर उभारला आहे. या ठिकाणी दररोज शेकडो दूरध्वनी हे खाटा पाहिजे यासाठी येत असतात. यात अतिदक्षता, जीवरक्षक प्रणाली, प्राणवायू आणि साधा खाटांच्या मागणीचा समावेश असतो. १ मे पासून ही मागणी कमी झाली असून मंगळवारी अतिदक्षता रुग्णशय्यांची प्रतीक्षा यादी अखेर संपुष्टात आली. जीवरक्षक प्रणालीसाठी तीन जण प्रतीक्षा यादीवर आहेत तर १३ जण शहराबाहेरील रुग्णांची संख्या आहे.

राज्यातील मोठय़ा शहरात करोना विषाणूचे उत्परिवर्तन झपाटय़ाने होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी असताना मृत्युदर जास्त असल्याचे दिसून आले आहे. यात तरुणांचादेखील समावेश आहे. यापूर्वीच्या उत्परिवर्तनामध्ये ५० पेक्षा जास्त वय असलेल्या रुग्णांचा समावेश आहे. मात्र आता यात तरुणांचादेखील समावेश असून त्यांची प्राणवायू पातळी झपाटय़ाने कमी होताना दिसत आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत हा मृत्युदर कमी होईल अशी आशा आहे.

– अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका

पाच दिवसातील रुग्णस्थिती

दिनांक        रुग्ण   मृत्यू

३० एप्रिल      ४५७    १०

०१ मे        ३८१    ०८

०२ मे         ४२४    ११

०३ मे        २७७    ०७

०४ मे        ३२६    १२

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2021 2:44 am

Web Title: concerns over corona deaths in navi mumbai panvel zws 70
Next Stories
1 पनवेलमध्ये दिवसभरात २० जणांचा मृत्यू
2 खड्डा दिसल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई
3 नव्या कर धोरणालाही पनवेलकरांचा विरोध
Just Now!
X