नवी मुंबईच्या महापौर व उपमहापौरांची निवडणूक ९ नोव्हेंबरला होणार असल्याने सर्व प्रमुख पक्षांनी आपल्या नगरसेवकांना घेऊन अज्ञातस्थळ गाठले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील रस्सीखेच पाहता काँग्रेसच्या १० नगरसेवकांना मोठे महत्त्व आल्यामुळे त्यांना चार गटांत अज्ञातस्थळी नेण्यात आले आहे.

नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे व उपमहापौर अविनाश लाड यांची अडीच वर्षांची मुदत ९ नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. त्यांच्या जागी नवीन महापौर व उपमहापौर निवडले जाणार असून त्यांची निवड ९ नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता होणार आहे. यंदाचे महापौरपद हे इतर मागासवर्गीयांसाठी राखीव आहे. राष्ट्रवादीमध्ये या पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. १११ नगरसेवकांच्या सभागृहात राष्ट्रवादीचे ५२, शिवसेनेचे ३८, काँग्रेसचे १०, भाजपचे ६ आणि अपक्ष ५ असे संख्याबळ आहे. राष्ट्रवादीने अडीच वर्षांपूर्वी अपक्ष व काँग्रेसच्या मदतीने सत्ता काबीज केली होती. यंदा राष्ट्रवादीचे काही नगरसेवक फुटीच्या मार्गावर असल्याने त्यांचे संख्याबळ कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसच्या १० नगरसेवकांची राष्ट्रवादीला गरज आहे. या नगरसेवकांना मोठय़ा रकमेची अमिषे दाखविण्यात आली असून अनेक महत्वाची पदे देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे चार नगरसेवक वगळता सर्व नगरसेवकांना माजी खासदार संजीव नाईक आमदार संदीप नाईक व माजी महापौर सागर नाईक यांच्या देखरेखेखाली अज्ञातवासात नेण्यात आले आहे. या नगरसेवकांना मतदानाच्या दिवशी प्रगट केले जाणार आहे.

शिवसेनेने आपल्या नगरसेवकांना वसई येथील एका रिसॉर्ट व नेले असून काही नगरसेवकांची व्यवस्था पाचगणीला केली जाणार आहे. काँग्रेसच्या नगरसवकांची असलेली ‘मागणी’ लक्षात घेता त्यांना निरीक्षक भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली अज्ञातस्थळी नेण्यात आले आहे. भाजपचे सहा नगरसेवक शिवसेनेबरोबर जाणार असल्याने त्यांनाही शिवसेनेने आपल्या सोबत ठेवले आहे. अपक्ष नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर राहणार असल्याचे प्रतिज्ञापत्र दिल्याने राष्ट्रवादीने त्यांना ‘गायब’ केले आहे. महापौरपदासाठी शिवसेनेने विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचे नाव निश्चित केले असून त्यांनी राष्ट्रवादीतील काही नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय काँग्रेसच्या काही नगरसेवकांबरोबर सुत जुळविले आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, पण राष्ट्रवादीचे कोणीही नगरसेवक शिवसेनेबरोबर जाणार नाहीत, असे त्यांचे नेते ठणकावून सांगत आहेत.