आंबा खरेदी करा; बागायतदार जगावा! २५ हजार पेटय़ा वितरित

नवी मुंबई : कोकणातील हापूस आंब्याच्या विक्रीसाठी उत्तम काळ असलेल्या एप्रिल महिन्यात करोना संसर्गामुळे फळ बाजार बंद असल्याने कृषी पणन विभागाने थेट विक्री सुरू केली आहे. या उपक्रमाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सद्य:स्थितीत मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई या भागांत २५ हजार हापूस आंब्याच्या पेटय़ा वितरित होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हापूस आंब्यावर यंदा नैर्सगिक संकट ओढवले आहे. गेल्या वर्षी लांबलेला पाऊस, थंडीचा अभाव यामुळे हापूस आंब्याचे उत्पादन यंदा नेहमीपेक्षा अर्ध्याने कमी झाले आहे. कमी उत्पादनाचा हा मोसम एप्रिलपासून सुरळीत सुरू होईल अशी अटकळ व्यापारी आणि बागायतदार यांनी बांधलेली असतानाच मार्चमध्ये करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागला. त्यामुळे २५ मार्चपासून सुरू झालेली टाळेबंदी कायम राहिली असून हापूस आंबा बागायतदारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. यंदा हापूस आंब्याच्या उत्पादनावर झालेला खर्च तरी निघेल का या विचारात बागायतदार आहेत.

तुर्भे येथील एपीएमसी फळ बाजार टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर कमी-अधिक प्रमाणात बंद ठेवण्यात आलेला आहे. मंगळवापर्यंत या घाऊक बाजारातील पाचही बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला असून बुधवारपासून भाजी व धान्य बाजाराव्यतिरिक्त इतर तीन बाजारपेठा बंद राहणार आहेत. त्यामुळे फळ बाजार पुढील पंधरा दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याच्या कृषी  विभागाने थेट पणन करण्यास आंबा बागायतदारांना परवानगी दिली आहे. त्यामुळे मागणी तसा पुरवठा या तत्त्वानुसार मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या भागांत थेट पुरवठा सुरू करण्यात आला आहे. याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून ग्राहक घरबसल्या आंब्याच्या पेटय़ांची मागणी नोंदवत आहेत. त्यानुसार ही नोंदणी करून घेतली जात असून त्या भागात तीस पेटय़ांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर छोटय़ा वाहनाद्वारे हा पुरवठा केला जात आहे.कोकणातील हापूस आंबा बागायतदार जगावा असे वाटत असेल तर हा आंबा खरेदी करा असे भावनिक आवाहनदेखील करण्यात येत आहे.

कोकणातील हापूस आंब्याला नेहमीच मागणी आहे. करोना संसर्ग काळात गाव ते थेट सोसायटी सुविधा सुरू करण्यात आली असून तिला चांगला प्रतिसाद आहे. या गाडीच्या र्निजतुकीकरणाची काळजी घेतली जात आहे. या आठवडय़ात दहा हजार पेटय़ांची नोंदणी झाली आहे.

– संजय यादवराव, कोकण भूमी प्रतिष्ठान, मुंबई