सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण जुहूगाव परिसरात

लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : करोनामुक्तीकडे शहराची वाटचाल सुरू झाल्यानंतर झोपडपट्टी भागात झपाटय़ाने रुग्ण कमी झाले होते. इंदिरानगर परिसरात रुग्णसंख्या शून्यावर तर चिंचपाडा, इलठणपाडा, कातकरीपाडा व तुर्भे परिसरात एक अंकी उपचाराधीन रुग्ण शिल्लक होते. मात्र गेला महिनाभर शहरात करोना रुग्णवाढ होत असताना झोपडपट्टी भागातही करोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे.

सद्य: स्थितीत सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण जुहूगाव नागरी आरोग्य केंद्रात तर सर्वात कमी इलठणपाडा व इंदिरानगर परिसरात आहेत.

नवी मुंबईत मार्चमध्ये करोना प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर महिनाभरात फक्त १२ करोना रुग्ण होते. मात्र त्यानंतर हा करोना आलेख वाढत जात जुलै महिन्यात ८,७८०, ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत सर्वाधिक १० हजार ७६४, सप्टेंबर महिन्यात १० हजार ५२४ व ऑक्टोबरमध्ये ७ हजार ८४८ करोना रुग्ण सापडले होते. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये यात निम्म्याने घट होत या महिन्यात रुग्णसंख्या ३ हजार ७३० वर आली होती. डिसेंबर व जानेवारीमध्येही रुग्णसंख्या कमी कमी होत होती. दैनंदिन रुग्णसंख्या ही ५० पेक्षा कमी झाली होती. त्यामुळे शहर करोनामुक्तीकडे वाटचाल करीत असल्याचे दिसत होते. करोनाची परिस्थिती अत्यंत नियंत्रणात आल्याचे बोलले जात होते.

या काळात शहरातील दाट वस्तीच्या झोपडपट्टी भाग हा प्रथम करोनामुक्तीकडे वाटचाल करीत होता. या परिसरात असलेल्या नागरी आरोग्य केंद्रांकडून घेतल्या गेलेल्या दक्षतेमुळे हे शक्य झाल्याचे पालिका आयुक्तांनी मान्य केले होते. महिनाभरापूर्वी झोपडपट्टी परिसरातील नागरी आरोग्य केंद्रामध्ये १ अंकी उपचाराधीन रुग्णसंख्या झाली होती. करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांना आरोग्य केंद्रांमार्फत तत्काळ शोधून त्यांच्या चाचण्या केल्या जात होत्या. त्यामुळे झोपडपट्टी भागात रुग्ण्संख्या कमी झाली होती. इंदिरानगर परिसरात तर उपचाराधीन रुग्णसंख्या शून्यापर्यंत गेली होती.

१ फेब्रुवारीपासून टाळेबंदी शिथिलीकरणामुळे शहरातील सर्व व्यवहार पूर्ववत सुरू झाले. त्यानंतर लोकल सेवाही सर्वासाठी खुली करण्यात आली. शहरात करोनाचे र्निबध शिथिल झाल्यानंतर गर्दी वाढली व सार्वजनिक कार्यक्रमांचे प्रमाणही वाढले. या सर्व परिस्थितमुळे परत करोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. ५० पेक्षा खाली गेलेली दैनंदिन रुग्णसंख्या आता  दिडशेपर्यंत गेली आहे. फेबुवारी महिन्यात २ हजार ३९० रुग्ण सापडले तर मार्चच्या चार दिवसांत ती ५५८ पर्यंत गेली आहे. दैनंदिन रुग्ण वाढत असल्याने आता करोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या झोपडपट्टीतही रुग्ण वाढत आहेत. जुहूगाव, रबाळे व सानपाडा परिसरात १३५ पर्यंत उपचाराधीन रुग्णांची संख्या गेली आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रांमार्फत आता या परिसरावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

१२२ नवे बाधित शुक्रवारी नवी मुंबईत १२२  नवे करोनाबाधित आढळले  असून  दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

संसर्ग खंडित करण्यासाठी एका रुग्णामागे शहरातील सर्वाधिक ३१ जणांशी संपर्क केला जात आहे. महिनाभरापूर्वी इंदिरानगरमध्ये  ० तर तुर्भे येथे ९ असे एक अंकी उपचाराधीन रुग्ण होते. परंतु आता येथील रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी करोना नियमांचे पालन करीत आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे.

-डॉ. कैलास गायकवाड, प्रमुख, तुर्भे नागरी आरोग्य केंद्र