News Flash

‘एपीएमसी’त दोनशे जणांवर गुन्हे दाखल

नवी मुंबईत करोनाचे रुग्ण वाढत असताना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचही बाजारात करोना नियमांची पायमल्ली होत असल्याचे दोन दिवसांपूर्वी पालिका आयुक्तांनी केलेल्या पाहणीत समोर

याची गंभीर दखल घेत महापालिका व पोलिसांनी या परिसरात कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे.

करोना नियमांची पायमल्ली; महापालिका, पोलिसांची संयुक्त कारवाई

लोकसत्ता वार्ताहर

नवी मुंबई : नवी मुंबईत करोनाचे रुग्ण वाढत असताना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचही बाजारात करोना नियमांची पायमल्ली होत असल्याचे दोन दिवसांपूर्वी पालिका आयुक्तांनी केलेल्या पाहणीत समोर आले आहे. याची गंभीर दखल घेत महापालिका व पोलिसांनी या परिसरात कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे. गुरुवारी दिवसाभरात नियम न पाळणाऱ्या दोनशे जणांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहरात गेल्या दोन आठवडय़ांपासून करोनाचे रुग्ण वाढत आहेत. दैनंदिन ३० पर्यंत खाली आलेली रुग्णसंख्या १५० पेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे शहरात करोनाची परिस्थिती पुन्हा एकदा धोकादायक वळणावर पोहोचत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने शहरात करोना नियमांचे कडक पालन व्हावे यासाठी काही र्निबध लागू करणे सुरू केले आहे. नवी मुंबईत सर्वाधिक वर्दळीचे ठिकाण हे ‘एपीएमसी’ आहे. पहाटेपासून दिवसभर या पाचही बाजारांत काम सुरू राहत असल्याने दिवसभर गर्दी असते. दररोज ५० ते ६० हजार व्यापारी, शेतकरी, आडतेदार, ग्राहक या ठिकाणी येत असतात. त्यामुळे या ठिकाणी संसर्गाचा धोका अधिक आहे. गेल्या वर्षीही शहरात करोना संसर्ग सुरू झाल्यानंतर एपीएमसी हॉटस्पॉट ठरली होती. या ठिकाणाहून शहरांत संसर्ग मोठय़ा प्रमाणात पसरला होता. त्यामुळे आताच्या परिस्थितीतही एपीएमसीवर अधिक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मात्र असे असतानाही या ठिकाणी करोना नियमांचे कडक पालन होताना दिसत नाही.

त्यानुसार गुरुवारी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे तसेच महापालिकेच्या दक्षता पथकाडून मोठी कारवाई करण्यात आली. यामध्ये बाजार समितीत आतापर्यंत २००जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बुधवारीही मसाला बाजार आणि मर्चंट चेंबरमध्ये सायंकाळी ५ ते ७ कालावधीत कारवाई करीत १४४ जणांना ६१ हजार १००रुपये दंड वसूल केला आहे. महापालिकेने दोन दक्षता पथक नेमली असून त्यात पोलिसांकडून ५ जणांचा समावेश आहे.

गुरुवार मसाला मार्केटमध्ये पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या पथकाकडून मास्क न घालणाऱ्या व्यापारी, माथाडी कामगार, ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई सातत्याने अशीच सुरू राहणार असल्याचे महापालिकेच्या तुर्भे विभागाचे उपायुक्त सुबोध ठाणेकर यांनी सांगितले.  या मोहिमेमध्ये साहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त, तुर्भे विभागाचे साहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर आणि इतर पोलीस व महापालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

एपीएमसीतील दंडात्मक कारवाई

मुखपट्टीचा वापर न करणाऱ्या ५१ जणांकडून प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे २५ हजार ५०० रुपये

सुरक्षित अंतराचा नियम न पाळणाऱ्या ८३ व्यक्तींकडून प्रत्येकी २०० रुपये प्रमाणे १६ हजार ६०० रुपये

९ आस्थापनांकडून प्रत्येकी  २ हजारप्रमाणे १८ हजार रुपये

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या एका व्यक्तीकडून १ हजार रुपये

एकूण दंड वसुली  ६१ हजार १०० रुपये

गुरुवारी ६० जणांवर कारवाई

एपीएमसीमध्ये मोठय़ा प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. तरीही करोना नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे एपीएमसी करोनाचा केंद्र ठरू नये म्हणून ही कारवाई करण्यात आली. नागरीकांमध्ये सुरक्षितेविषयी जनजागृतीही करण्यात येत आहे.

-सुरेश मेंगडे, पोलीस उपायुक्त,परिमंडळ १

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2021 12:29 am

Web Title: corona rules not followed apmc market action taken dd 70
Next Stories
1 राहाण्यायोग्य शहरांत नवी मुंबई देशात सहावी
2 ‘ती’ १५ वाहने दिल्लीत नष्ट करणार
3 रुग्णसंपर्क शोध वेगात
Just Now!
X