५०,४५२ करोनाबाधितांपैकी ४८४३२ जण करोनामुक्त

नवी मुंबई जून महिन्यात ५७ टक्केवर असलेला करोनामुक्तीचा दर नोव्हेंबर महिन्यात ९४ टक्केवर पोहोचला होता. यात दोन टक्केनी वाढ होत आता ९६ टक्के झाला आहे. शहरात ५०,४५२ करोनाबाधितांपैकी ४८४३२जण करोनामुक्त झाले आहेत.

करोनामुक्तीचा दर सातत्याने वाढत असल्याने शहर करोनामुक्तीच्या दिशेने जात असल्याचे बोलले जात आहे. दररोजच्या नव्या करोना रुग्णांची संख्या आता शंभरच्या आत आली आहे. चाचण्यांची संख्याही कमी करण्यात आली नाही. दिवाळीपूर्वी व दिवाळीनंतरही करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढली होती. त्यानंतर शहरात जास्तीत जास्त चाचण्या करीत तात्काळ उपचार करण्याकडे पालिकेने लक्ष केंद्रित केले होते. यासह इतर अनेक उपाययोजनांमुळे करोनामुक्त होण्याचा दर वाढला आहे.

करोनामुळे आतापर्यंत एकूण १०३८ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ५० वयोगटांवरील रुग्ण अधिक आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी करोना नियमांचे पालन करण्याची आवश्यकता असल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी सांगितले.

करोनामुक्तीचा दर

* जून : ५७ टक्के

* जुलै : ६४ टक्के

* ऑगस्ट :  ६७ टक्के

* सप्टेंबर : ८५ टक्के

* ऑक्टोबर : ८८ टक्के

* नोव्हेंबर : ९४ टक्के

* डिसेंबर : ९६ टक्के

करोनास्थिती

५०,४५२ कूण करोनाबाधित

४८४३२ करोनामुक्त :

९८२   उपचाराधीन रुग्ण

१०३८ करोनामुळे मृत्यू

पनवेलमध्ये २६,२७४ रुग्ण

पनवेल : शहर पालिका क्षेत्रात २६ करोनाचे नवे रुग्ण बुधवारी आढळले असून आतापर्यंत पालिका क्षेत्रातील करोनाग्रस्तांची संख्या २७,२०६ वर पोहोचली आहे. ५९५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत २६,२७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

पालिका क्षेत्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५७ टक्के  एवढे असून यामध्ये कामोठे व खारघर येथे ९७ टक्क्यांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. बुधवारी तळोजा परिसरात एकही रुग्ण सापडला नाही. पनवेल पालिका क्षेत्रात सिडको मंडळ मागील महिनाभरापासून कळंबोली येथे कोविड काळजी रुग्णालय उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र २८ डिसेंबर रोजी या रुग्णालयाचे काम पूर्ण होऊन त्यामध्ये साहित्य उभारले जाणार आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात हे रुग्णालय सुरू होण्याच्या वाटेवर आहे.