सोमवारपासून शाळा सुरू करण्याची पालिका व खासगी शिक्षण संस्थांची तयारी

लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : सोमवारपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरविण्याची तयारी पालिका प्रशासन तसेच खासगी शाळा प्रशासनाने केली असून वर्गाची स्वच्छता सुरू आहे. मात्र पालक अजूनही संभ्रमात आहेत. करोना रुग्ण पुन्हा वाढत असल्याने पालकांची संमती अल्प प्रमाणात मिळाली असल्याचे शाळा व्यवस्थापनाने सांगितले. असे असले तरी प्रतिसाद मिळेल असाही आशावाद व्यक्त केला आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे १६ मार्चपासून शाळा बंद आहेत.  शासनाने नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग वर्ग सुरू करण्यास सांगितले आहे. त्यानुसार नवी मुंबईत पालिका शिक्षण विभाग व खासगी शाळा प्रशासनाने तसे नियोजन केले आहे. शासनाच्या नियमावलीनुसार शाळा सुरू करण्याची तयारी केली आहे.

नवी मुंबई महापालिकेत प्राथमिक व माध्यमिक विभागात मिळून ४५ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून पालिकेच्या १८ माध्यमिक शाळांमध्ये ५ हजार ५०० हून अधिक विद्यार्थी आहेत. तर  खासगी शाळांमध्ये जवळजवळ २४ हजारांपर्यंत ९ वी ते १२ वीचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सोमवारपासून प्रत्येकी ४० मिनिटांचे ४ तास होणार आहेत. यासाठी खबरदारी म्हणून शाळा र्निजतुकीकरण करून घेतल्या आहेत. शाळेत एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. मुखपट्टी नसल्यास शाळेत प्रवेश दिला जाणार नाही. त्याचबरोबर शाळेत येण्यासाठी पालकांचे संमतिपत्रक अनिवार्य करण्यात आले आहे.

नवी मुंबईत करोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. गेल्या आठवडाभर शंभरपेक्षा खाली दररोज रुग्ण आढळत होते, मात्र गुरुवा्ररी ही संख्या १७५ पर्यंत गेली आहे. दिवाळीत झालेली गर्दी पाहता रुग्णवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पालकवर्ग मुलांना शाळेत पाठविण्यास अजूनही तयार झालेला दिसत नाहीत. शाळा सुरू होत आहे, ही आनंदाची बातमी आहे. भीती वाटत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे.

आम्ही सोमवारपासून शाळा सुरू करण्याची तयारी केली असून नियमाप्रमाणे सर्व गोष्टी केल्या आहेत. आमच्या शाळेत ९ वी ते १२ वीचे १२०० विद्यार्थी आहेत. मात्र यातील फक्त दोन विद्यार्थ्यांच्या पालकांनी अनुमती दिली असल्याचे सेंट झेवियर्स शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा अंधनसरे यांनी सांगितले. तर पुणे विद्यार्थिगृहाचे संचालक दिनेश मिसाळ यांनी  एकू ण २८५ विद्यार्थ्यांचे नियोजन झाले आहे. मात्र यातील ३८.६० टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यासाठीचे संमतिपत्रक दिले असल्याचे सांगितले. पालिका शिक्षणाधिकारी योगेश कडुस्कर यांनी पालकांनी अद्याप संमती दिली नसल्याचे सांगितले आहे. मात्र पहिल्या दिवशी प्रतिसाद मिळेल अशी आशाही व्यक्त केली आहे.

शिक्षकांची करोना चाचणी

शिक्षकांना करोना चाचणी केल्याचे व करोनाबाधित नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार असल्याने पालिके ने गुरुवारपासून शहरातील पालिकेच्या माध्यमिक विभागातील शिक्षकांच्या व कर्मचाऱ्यांच्या करोना चाचण्या करण्यास सुरुवात केली आहे. नेरुळ व ऐरोली येथील केंद्रांवर स्वतंत्र व्यवस्था केली आहे. सोमवापर्यंत शिक्षकांच्या चाचण्या पूर्ण करण्यात येणार असल्याचे पालिका शिक्षणाधिकारी योगेश कडुस्कर यांनी सांगितले.

तपासणीनंतरच प्रवेश

महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना दोन मुखपट्टी व सॅनिटायजरचे वाटप केले जाणार आहे. शाळेचे र्निजतुकीकरण केले आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांचे तापमान, प्राणवायू तपासले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक वर्गासाठी एक थर्मल गन, ऑक्सिमीटर दिला जाणार आहे.