अहवाल मिळण्यास आठ ते नऊ दिवस उशीर

नवी मुंबई : राज्य शासनाच्या चार आणि पालिकेच्या तीन प्रयोगशाळा करोना रुग्णांचा अहवाल देण्यासाठी सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, नवी मुंबई पालिका क्षेत्रात आजही रुग्णांचे ‘स्व्ॉब’अहवाल येण्यास आठ ते नऊ दिवस लागत आहेत. अहवालाच्या प्रतीक्षेतील काही रुग्ण ठणठणीत बरे झाल्याची उदाहरणे आहेत. अहवाल मिळण्यास उशीर होत असल्याने संशयित विषाणूचे वाहक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नवी मुंबई पालिका नेरुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वतंत्र प्रयोगशाळा उभारत आहे. गेली चार महिने पालिकेने स्वत:ची प्रयोगशाळा सुरू करावी, यासाठी लोकप्रतिनिधींकडून आग्रह धरला जात आहे. त्यामुळे प्रथम वाशी येथील पालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात प्रयोगशाळा उभारण्यात येणार होती. मात्र, जागा अपुरी पडत असल्याचे कारण देत पालिकेने ही प्रयोगशाळा नेरुळमध्ये उभारण्यास प्राधान्य दिले.

याशिवाय पालिकेने पुण्यातील ‘कृष्णा डायग्नोस्टिक’ प्रयोगशाळेस स्वॅब अहवाल देण्यासाठी करारबद्ध केले आहे.  नवी मुंबईत रुग्णांची संख्या एक हजारच्या आसपास असताना ‘कृष्णा डायग्नोस्टिक’ने स्वॅब जमा करण्याची परवानगी मागितली होती. मात्र, ती नाकारण्यात आली. मात्र करोनास्थिती हाताबाहेर गेल्यानंतर या प्रयोगशाळेला परवानगी देण्यात आली.

मुंबईतील कस्तुरबा, जे. जे. रुग्णालय, टाटा आणि एसआरएल या प्रयोगशाळांना करोना रुग्णांचे स्वॅब पाठविले जात आहेत. याशिवाय मेट्रोपॉलिस या प्रयोगशाळेने १५ हजार स्वॅब अहवाल मोफत देण्याची तयारी दर्शवली आहे.

सद्यस्थितीत सहा प्रयोगशाळा शहरातील रुग्णांचे स्वॅब अहवाल देत आहेत. विसंगत अहवाल देणाऱ्या ‘थायरोकेअर’ प्रयोगशाळेला शहरात स्वॅब जमा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सहा प्रयोगशाळेत शहरातील रुग्णांचे अहवाल जात असताना ७०० पर्यंत रोज अहवाल प्रलंबित आहेत. यामुळे घरातच अलगीकरण करण्यात आलेले हे रुग्ण रोगाचे वाहक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाशी गावातील ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ सुरकी जोशी यांचा स्व्ॉब नमुना सहा जुलै रोजी नेण्यात आला होता. त्यांना अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही. त्याचवेळी ऐरोली गावातील रहिवाशी सचिन पवार यांना आठ दिवसानंतर अहवाल निकाल देण्यात आला. तोपर्यंत त्यांचे घरीच अलगीकरण करण्यात आले.  त्यांचा अहवाल येईस्तोवर ते ठणठणीत बरे झाले होते.

खर्च केल्यास २४ तासांत..

अशा प्रकारच्या अनेक घटना घडत असून खासगी प्रयोगशाळेत करण्यात आलेले तपासणी अहवाल हे केवळ २४ तासांत प्राप्त होत आहेत. मात्र, त्यासाठी रहिवाशांना तीन ते चार हजार रुपये खर्च करण्याची तयारी ठेवावी लागत आहे.