महानगर बँकेच्या घणसोली शाखेतून तिघा जणांनी बनावट कागदपत्रांद्वारे बँकेला गंडवल्याची घटना घडली आहे. या तिघांनीही बँकेकडून तब्बल एकूण ११ लाखांचे कर्ज काढले होते. कोपरखरणे पोलिसांनी याप्रकरणी तीन कर्जदारांसह आणखी दोघे अशा नऊ जणांवर बनावट कादपत्रे बनवल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. या बँकेतून २०१४ मध्ये दोघा कर्जदारांनी प्रत्येकी तीन लाख व एका कर्जदाराने पाच लाखांचे कर्ज घेतले होते. यावेळी या तिघा कर्जदारांनी बँकेकडे कागदपत्रे व प्रत्येक दोन जामीनदारांची कागदपत्रेसुद्धा सादर केली होती. या तिघा कर्जदारांनी बँकेचे हप्ते भरणे बंद केल्याने बँकेने कर्जदारांनी दिलेल्या पत्त्यावर पाहणी केली. त्यावेळी दुसरी व्यक्ती राहत असल्याचे आढळून आले. तसेच बँकेला कागदपत्रेही बनावट असल्याचे आढळून आले. या प्रकरणी बँकेने न्यायालयात धाव घेऊन कर्जदारांची माहिती दिली. तेव्हा कोपरखरणे पोलिसांना न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्याुनसार पोलिसांनी नऊ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

तीन लाखांची चोरी

नेरुळ येथील कंपनीतून तीन लाखांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. तुभ्रे एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरटय़ांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  नेरुळ एमआयडीसीतील डी ३८२ या प्लॉटवर दास ऑफशोर कंपनी आहे. या कपंनीमध्ये गेल्या आठवडय़ात सुमारे तीन लाख रुपये किमतीची वेल्डिंग केबलचे बंडल ठेवण्यात आले होते. या वेल्डिंग केबलची चोरी झाली आहे. या प्रकरणी तुभ्रे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कामोठय़ात व्यापाऱ्याची हत्या

कामोठे गावातील प्रवेशद्वाराच्या कमानीपासून काही अंतरावर याच गावात ज्योती इलेक्ट्रिक दुकानाच्या मालकाचा मृतदेह आज पहाटे पोलिसांना आढळला. छातीवर चाकूचे वार असल्याने पोलिसांनी अनोळखी व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. विनोदकुमार शहा असे (४७)  असे मृताचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शहा यांची त्यांच्या कुटुंबीयांशी सतत भांडणे होत असत. शहा हे तापट स्वभावाचे होते. या घटनेनंतर शहा यांच्या ओळखीतील व्यक्तींची जबानी नोंदविण्यात आली. शहा रात्री किती वाजता घराबाहेर गेले, त्यांचे शेवटचे बोलणे कोणाशी झाले याविषयीची माहिती घेण्यात आली. रात्री अडीच वाजता शहा हे घरात भांडण करून निघाल्यानंतर ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. शहा यांच्यासोबत त्यांची आई, पत्नी, दोन मुले आणि दोन मुली राहतात.

शहा हे विठोबा म्हात्रे यांच्या चाळीत राहतात, तर म्हात्रे यांच्या मालकीचे दुकान शहा हे भाडय़ाने घेऊन तेथूनच व्यवसाय करीत होते. विशेष म्हणजे कामोठे ग्रामपंचायतीने कामोठे वसाहतीत सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला; मात्र कामोठे गावात प्रवेशद्वारावर एकही सीसीटीव्ही कॅमेरा न लावल्याने शहा यांचा खून कोणी केला याचा शोध घेताना पोलिसांना अडथळा येत आहे.