घरफोडी करणाऱ्या मोठय़ा टोळीला पकडण्यात नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी घरफोडी करणाऱ्या सात जणांना अटक केली असून त्यांच्याकडून पावणेदहा लाखांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. या आरोपींच्या चौकशीतून अन्य ३१ घरफोडींचीही उकल झाली आहे.
घणसोली गावात २६ सप्टेंबरला घरफोडी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचून ज्ञानेश्वर खालापुरे, अस्लम शेख व मिथिलेश या तिघांना पकडले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून दीपक इक्कर, मिथुन प्रधान यांच्यासह त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही पोलिसांनी पकडले. या अल्पवयीन आरोपींना बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. उर्वरित आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी फर्मावली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे दीपक इक्कर, मिथुन प्रधान, ज्ञानेश्वर खालापुरे, अस्लम  शेख, मिथिलेश असे असून या आरोपींकडून ७ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, दोन लॅपटॉप, १८ मोबाइल फोन व एक ऑटो रिक्षा असा एकूण ९ लाख ८० हजारांचा माल जप्त करण्यात आला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.