उकल होण्याचे प्रमाणही अत्यल्प; पोलिसांपुढे मोठे आव्हान

नवी मुंबई : करोना टाळेबंदी काळात गुन्हे घटल्याने २०२० या वर्षात शहरात गुन्हे कमी झाल्याचे दिसत असले तरी सायबर गुन्ह््यांत मोठी वाढ झाली आहे. २०१९ च्या तुलनेत ही वाढ तीनपटीपेक्षा जास्त असून उकल होण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. त्यामुळे पोलिसांपुढे हे मोठे आव्हान असणार आहे.

नवी मुंबई पोलिसांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत वार्षिक गुन्हे आढावा घेतला. यात शहरात २०१९च्या तुलनेत २०२० मध्ये १ हजार ५५६ गुन्ह्यांत घट झाली असल्याचे पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांनी दिली. कोरोनाकाळात लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे गुन्हे कमी घडल्याने ही घट दिसत आहे. असे असले तरी त्याचा गुन्हे प्रगटीकरण टक्केवारीत फरक पडलेला दिसत आहे. यात तीन टक्क्याने घट झाली आहे. या वर्षात आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण हे दुपटीपेक्षा जास्तीने वाढले आहे. २०१९ मध्ये गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण २५.३६ होते ते २०२० वर्षात ६८.४२ टक्के पर्यंत गेले आहे.

पोलिसांनी या वेळी दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२० या वर्षात २३२ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली असून यातील फक्त २१ गुन्हे उकल झाले आहेत. २०१९ मध्ये शहरात ७४ गुन्ह्यांची नोंद झाली होती. १२ गुन्ह्यांची उकल झाली होती. या दोन वर्षांत ३०६ गुन्हे घडले असून यातील एकही गुन्हा अद्याप सिद्ध झालेला नाही. टाळेबंदीत ऑनलाइन व्यवहार वाढल्याने हे गुन्हे वाढले असून यात ओटीपी, क्यूआर        कोडचा वापर  करीत ५५ तर ‘ओएलएक्स’वरून ३२, फेसबुकच्या माध्यमातून झालेल्या मैत्रीतून ४, ऑनलाइन फसवणुकचे १०९, कार्ड क्लोनिंगचे १५ तर ऑनलाइन नोकरीच्या आमिषातून ९ असे  असे २३२  गुन्हे घडले आहेत. तर १ हजार ६०० पेक्षा अधिक तक्रारी सायबर शाखेकडे आल्या आहेत.

आगामी काळातही यात वाढ होणार असल्याने सायबर गुन्हे घडू नयेत म्हणून जनजागृतीबरोबर ते उकल करणे हे पोलिसांपुढील मोठे आव्हान आहे.

पत्रकार परिषदेत सहआयुक्त बीजी शेखर पाटील, जय जाधव, गुन्हे शाखा उपायुक्त प्रवीणकुमार, परिमंडळ एकचे उपायुक्त सुरेश मेंगडे, वाहतूक शाखा उपायुक्त पुरुषोत्तम कराड आदी उपस्थित होते.

रस्ते अपघातांत २०२० मध्ये घट झाली आहे. ३३० मोटार अपघात झाले असून २५२ जणांचे अपघाती मृत्यू झाले आहेत २०१९ मध्ये ५०१ अपघातांत २७१ जणांचा मृत्यू झाला होता. येत्या काही दिवसांत रस्ता सुरक्षा साप्ताह सुरू करण्यात येणार असल्याचे या वेळी पोलिसांनी सांगितले.

२०२० मधील महत्त्वाची कामगिरी

  •  आर्थिक गुन्हे शाखेने १९ गुन्ह्यांत ५८ जणांना अटक केले.
  •  देशभरात पंचतारांकित हॉटेलमध्ये चोरी करणाऱ्यास नवी मुंबई पोलिसांनी अटक करीत अवघ्या एकाच सुनावणीत आरोपीला शिक्षा झाल्याची राज्यातील पहिलीच घटना घडली.
  • ऑन लाइन लॉटरी राइस लिलाव नावाखाली फसवणूक करणाऱ्या आठ आरोपींना अटक करीत त्यांच्याकडून २७ लाख ८१ हजार ६८० रुपयांचा माल जप्त केला.
  •  डॉक्टर असल्याची बतावणी करून नवी मुंबई, ठाणे, पुणे येथील महिला डॉक्टरांचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक
  • पनवेलमध्ये मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस धागेदोरे नसताना अटक.
  •  एनआरआय पोलीस ठाणेअंतर्गत गाडीतून महिलेचे अपहरण करून तिचा खून करणाऱ्या चार आरोपींना अटक.
  •  १२ वर्षांपूर्वी एपीएमसीमध्ये घडलेल्या हत्येच्या गुन्ह्याची उकल.
  •  तळोजा पोलीस ठाणेअंतर्गत हत्याप्रकरणी आरोपींना ६ तासांत अटक.
  •  वाहनमालकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक करीत १६५ पेक्षा अधिक वाहने वाहनमालकांच्या स्वाधीन.

अमली पदार्थ विक्रीप्रकरणी १०६ आरोपींना अटक

‘ड्रग्ज फ्री नवी मुंबई’ मिशनअंतर्गत या वर्षी ९३ लाख ९९  हजार ५५२  रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून ६१ गुन्हे दाखल आहेत. यात १०६ आरोपींना अटक केली आहे. २०१९ मध्ये १५४ गुन्ह्यांत २४५ आरोपींना अटक करीत २.८ कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. तंबाखूजन्य पदार्थावर बंदी असताना विक्री होत असल्याने २०२० मध्ये पोलिसांनी ५९ लाख ३० हजार ९०८ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी ३ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. २७ हजारांच्या सिगारेट जप्त केल्या आहेत.