टाळेबंदीतील कठोर नियमावलीमुळे मिठाई दुकानदारांचे कोटय़वधींचे नुकसान

शेखर हंप्रस, लोकसत्ता

नवी मुंबई : दहावी-बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या आनंदातील काही आनंद मिठाई दुकानदारांना वाटून घेत असतात. निकालाच्या दिवशी विद्यार्थी मिठाई वाटून आनंद व्यक्त करतात. मात्र, यंदा करोनाकाळात मिठाई व्यावसायिकांचा धंदा बसला आहे. शहरात काही ठिकाणी अर्धा दरवाजा उघडून व्यवसायासाठी धडपड करणारे काही दुकानदार दिसले. मात्र, लाखोंऐवजी काही हजारांवर व्यवसाय झाल्याची खंत काहींनी व्यक्त केली.

मुंबई विभागात एक लाख ६४ हजार ९५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर एक लाख ४३ हजार ५०८ उत्तीर्ण झाले.  बारावीच्या निकालानंतर प्रत्येक विद्यार्थी किमान एक किलो  पेढे विकत घेतात. अनेकदा पेढय़ा ऐवजी कलाकंद, पेठा, सोनपापडी असे अन्य गोड  पदार्थही घेऊन जातात. याशिवाय घरी बासुंदी, गुलाबजाम, रसगुल्ले, रसमलाईसुद्धा ताटात असतात.  निकालाच्या दिवशी खास मिठाई आणि पेढय़ांसाठी वेगळ कक्ष उभारला जातो.

मात्र कोरोना मुळे  मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल या ठिकाणी टाळेबंदी असल्याने दुकानच बंद आहेत. काही दुकानदारांनी धाडस करीत दरवाजा अर्धवट उघडा ठेवून व्यवसायासाठी धडपड केली. मात्र, नेहमी प्रमाणे व्यवसाय झाला नाही. काहींनी मिठाईची घरपोच सेवा असल्याने दुकानाबाहेर मोबाइल क्रमांक पुरवला आहे.

गुरुवारी निकालाच्या दिवशी तयार पदार्थ वितरण करणाऱ्या अनेक कंपन्यांनी खाद्यपदार्थासह मिठाई आणि  पेढे  पुरविण्याची सेवा उपलब्ध करून दिली.

अनेक जण पाव किलोपासून १० किलोपर्यंत पेढे विकत घेतो. मात्र, प्रत्येक जण किमान १ किलो पेढे विकत घेतो. निकालाच्या दिवशी ७०० रुपये किलो तरी असतो हा पेढा गृहीत धरला तरी आजचे नुकसान १० कोटी ४ लाख ५५ हजार ६०० रुपयांचे असल्याची माहिती एका मिठाई दुकानदाराने दिली.

मुलगा उत्तीर्ण झाला, या आनंदात पेढे घेण्याचे ठरवले. मात्र, दुकान सुरू नसल्याने ऑनलाइन मागवले मात्र नेहमीच्या मिठाईच्या दुकानातील चव त्याला नाही, असे मालिनी म्हात्रे  यांनी सांगितले.

१२ निकालावेळी आम्हाला किमान ५०० ते ५०० किलो खवा लागतो तर ७०० ते ८०० किलो फक्त पेढा विकला जातो अन्य गोड  पदार्थही मोठय़ा प्रमाणात विकले जातात. करोनाकाळात दुकान प्रतिबंधित क्षेत्रात आल्यान  बंद ठेवावे लागले आहे.

-सत्यप्रकाश जाजू, मिठाई दुकानदार