करोना रुग्णांची पालिका रुग्णालयापर्यंतची फरपट थांबणार

नवी मुंबई : करोना उपचारासाठी वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रातील कोविड केंद्रात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या ‘सीटीस्कॅन’ चाचणीसाठी त्यांना वाशीतील पालिका रुग्णालयात नेण्याची कसरत पालिकेला करावी लागत होती. या पार्श्वभूमी वर वाशी कोविड केंद्रातच ही सुविधा उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पालिकेला सामाजिक दायित्व निधीमधून हे तपासणी यंत्र उपलब्ध होणार आहे.

वाशी स्थानकानजीक असलेल्या सिडको प्रदर्शनी केंद्रात नवी मुंबई महापालिकेने कोविड केंद्र उभारले असून गेले जवळपास वर्षभर हे केंद्र कार्यरत आहे. या ठिकाणी पालिकेने क्ष-किरण तपासणी सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र, सीटीस्कॅन सुविधा येथे नाही. करोना विषाणू थेट फुप्फुसात शिरकाव करत असल्यामुळे फुप्फुसातील संसर्गाचे प्रमाण जाणून घेण्यासाठी ‘एचआरसीटी’ चाचणी करावी लागते. वाशी कोविड केंद्रात ही सुविधा नसल्याने येथे दाखल होणाऱ्या रुग्णांना सीटीस्कॅनकरिता वाशीतीलच पालिका रुग्णालयात न्यावे लागते. याकरिता दररोज एनएमएमटीच्या रुग्णवाहिका बसमधून रुग्णांची ने-आण केली जाते. मात्र, त्यामुळे ठरावीक वेळेतच तपासणी करता येत होती. तसेच रुग्णांची ने-आण, वाशी पालिका रुग्णालयातील गर्दी या गोष्टींमुळे करोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत होती. पालिकेचे वाशी येथील रुग्णालय कोविडेतर रुग्णांसाठी खुले आहे. अशात तेथे करोनारुग्णांचीही चाचणी करण्यात येत असल्याने अन्य रुग्णांना संसर्गाचा धोका आहे.

या पार्श्वभूमी वर वाशी कोविड केंद्रातच सीटीस्कॅनची सुविधा उभी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. सामाजिक दायित्व फंडातून या सुविधेसाठी १ कोटी ६० लाखांची मदत होणार आहे. जर्मनीवरून ही मशीन आणली जाणार आहे. भविष्यात हेच मशीन महापालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयात सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. अभियंता विभागामार्फत काम करण्यात आले असून लवकरच ही सुविधा सुरू होणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

सामाजिक दायित्व निधीमधून जवळजवळ १ कोटी ६० लाखाची मदत होणार आहे. त्यामुळे हे केंद्र करोनाकाळात महत्त्वाचे ठरणार असून भविष्यातही हे कायमस्वरूपी महापालिकेसाठी उपयोगात येणार आहे. आयुक्तांच्या निर्देशानुसार ही सुविधा सुरू करण्यासाठी वेगवान कार्यवाही करण्यात येत आहेत. – सुजाता ढोले, अतिरिक्त आयुक्त