पंधरा दिवसांत २५ हजार अर्ज

ऑक्टोबर महिन्यात जाहीर केलेल्या महागृहनिर्मितीच्या सोडतीत शिल्लक राहिलेल्या ११०० घरांनाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला असून पहिल्या पंधरा दिवसांत २५ हजार मागणी अर्ज आले आहेत. सर्वसाधारणपणे शेवटच्या दिवसांत ग्राहक घरांची नोंदणी करीत असल्याचे आढळून आलेले आहे. त्यामुळे ही संख्या एक लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे.

सिडकोच्या १४ हजार ८३७ घरांसाठी एक लाख ९१ हजार अर्ज आले होते. त्या तुलनेत केवळ ११०० घरांसाठी मिळालेला प्रतिसाद मोठा आहे. सिडकोच्या घरांना देशभरातून असलेली मागणी लक्षात घेऊन ९० हजार घरांचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे.

सिडकोने गेल्या वर्षांपासून महागृहनिर्मिती हाती घेतली आहे. येत्या चार वर्षांत ५३ हजार घरे बांधण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून त्यात राज्य सरकारने आणखी चाळीस हजार घरांची भर टाकून हे लक्ष ९० हजार घरांचे ठेवले आहे. खारघर, कळंबोली, तळोजा, द्रोणागिरी आणि घणसोली येथे ऑगस्ट महिन्यात काढण्यात आलेल्या ऑनलाइन विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या घरांची ऑक्टोबर महिन्यात सोडत काढून विक्री करण्यात आलेल्या १४ हजार ८३८ घरांपैकी पत्रकार, प्रकल्पग्रस्त, सिडको कर्मचारी आणि माथाडी यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या घरांपैकी ११०० घरे विक्रीविना शिल्लक राहिलेली आहेत. सिडकोने ही घरे आता सर्वसामान्य ग्राहकांसाठी विक्रीस काढली असून यात आर्थिकदृष्टय़ा दुर्बळ घटकांसाठी केवळ ७३, तर अल्प उत्पन्न गटांसाठी एक हजार २७ घरे राखीव आहेत. या ११०० घरांसाठी पहिल्या पंधरा दिवसांत २५ हजार ३७२ मागणी अर्ज आले असून त्यातील ११ हजार ६९८ ग्राहकांनी ऑनलाइन अनामत शुल्क भरलेले आहे. त्यामुळे सिडकोच्या घरांना मागणी कायम असल्याचे दिसून येते. येत्या काळात सिडको मोठय़ा प्रमाणात घरांची निíर्मती करणार असून पहिल्या टप्प्यात ९० हजार घरे यंदा ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत.

सिडकोच्या घरांना आजही चांगली मागणी असल्याने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मोठय़ा प्रमाणात घरे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोच्या मागणी अर्जात शेवटच्या क्षणी जास्त भर पडत असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. सिडकोला अगोदरच शुल्क भरून त्यावरील व्याजावर का पाणी सोडावे, असा विचार सर्वसामान्य ग्राहक करीत असतात.

सिडकोकडे दिलेल्या शुल्कावर कोणत्याही प्रकारचे व्याज मिळत नाही; पण सिडकोला उशिरा हप्ता भरला तर मात्र सिडको चांगलाच व्याज दर आकारत असल्याचे आढळून येते. त्यामुळेच चंद्र यांनी एकीकडे बांधकाम आणि विक्री एकाच वेळी सुरू केली आहे. ग्राहक शेवटच्या क्षणापर्यंत शुल्क न भरण्याचे कारण बँकेतील व्याजाला कात्री बसू नये हे असल्याचे समजते.

सिडकोच्या महागृहनिर्मितीच्या सोडतीत ११०० घरे शिल्लक असून १ जानेवारीपासून त्यांची ऑनलाइन विक्री सुरू करण्यात आली आहे. प्रेम दिवस असलेल्या १४ फेब्रुवारी रोजी या घरांची सोडत काढली जाणार  आहे. मागणी अर्ज व शुल्क भरण्याचा प्रतिसाद पाहता ही अर्ज संख्या एक लाखाच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

– लक्ष्मीकांत डावरे, पणन व्यवस्थापक, सिडको