साद देती हिमशिखरे..

मुंबई व नवी मुंबईतील नऊ अवलियांनी भूतानच्या सीमेपासून भारत-चीन दरम्यानच्या नथुल्ला सीमारेषेपर्यंतचे खडतर अंतर नुकतेच सायकलवरून पूर्ण केले. या नऊ जणांमध्ये पनवेलच्या निसर्ग मित्र संस्थेचे धनंजय मदन, रेल्वे कर्मचारी जयकुमार,  सेवानिवृत्त कर्मचारी रमाकांत महाडिक, आरसीएफचे कर्मचारी गिरीष महाजन, केईएमचे कर्मचारी हितेन राणे, अंतर्गत सजावटकार मुग्धा पत्की, सिप्लाच्या कर्मचारी वैशाली हळदवणेकर, वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणारे अमित मोने आणि माथेरानचे अधीक्षक पवन चांडक यांचा समावेश होता.

२३ नोव्हेंबरला या सायकलस्वारांची यात्रा भूतानची सीमा असलेल्या पश्चिम बंगाल येथील मुंफू  येथून सुरू झाली. मुंफू येथे भूतान, नेपाळ व चीनच्या सीमारेषा एकत्र येत असल्याने या ठिकाणाला महत्त्व आहे. मुंफू ते दार्जिलिंग हा साठ किलोमीटरचा टप्पा पार करण्यासाठी पहाटे सहा वाजता निघालेले हे सायकलस्वार दुपारी साडेतीन वाजता तेथे पोहोचले.

दुसऱ्या दिवशी दार्जिलिंगमधील घूम येथून सिक्कीमच्या दिशेने या सर्वानी कूच केले. घाटात ३५ किलोमीटरचा चढ-उतार पार केल्यानंतर सिक्कीम येथील जोडथांग येथे त्यांच्या सायकली विसावल्या. यानंतर गेिझग पेलिंग या थंड हवेच्या ठिकाणी व नंतर गंगटोक येथील राणीपुल येथे ते पोहोचले. या प्रवासात या सर्वानी कडाक्याची थंडी, सतत बदलणारे वातावरण व विलोभनीय निसर्गसौंदर्य अनुभवले. तेथून नथुल्ला सीमारेषा गाठेपर्यंत रात्र झाली. या शेवटच्या टप्प्यात सर्वाना जोरदार हिमवृष्टीला तोंड द्यावे लागले. स्वत:जवळच्या बॅटऱ्या सायकलला पुढे लावून या सर्वानी नथुल्ला गाठले आणि ही बारा दिवसांची आव्हानात्मक यात्रा पूर्ण झाली.

सरकारी बाबूही सहभागी

पनवेलमध्ये तहसीलदार पदावर काम केलेल्या पवन चांडक यांचाही या नऊ जणांमध्ये समावेश होता. चांडक यांची सध्या माथेरानच्या अधीक्षकपदी बदली झाली असून या सायकलसफारीची बातमी त्यांनी वर्तमानपत्रात वाचली. या मोहिमेत सहभागी व्हावे, असे त्यांच्या मनात आले, मात्र महाविद्यालयीन जीवनानंतर सुटलेली सायकल त्याच सफाईने चालवता येईल का, याबाबत ते साशंक होते. यानंतर त्यांनी पनवेलमधील धनंजय मदन यांच्याशी संपर्क साधला. देशविदेशात अनेक खडतर सायकलमोहिमा सर केलेल्या मदन यांनी चांडकना प्रोत्साहन दिले. मदन यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार चांडक यांनी पावणे दोन महिने कसून सराव केला. बदलापूर ते पनवेल हे ३२ किलोमीटरचे अंतर पार केल्यानंतर त्यांनी पनवेल-महाळुंगे, पनवेल-पाली, पोलादपूर-महाबळेश्वर, पनवेल- लोणावळा, पनवेल-माथेरान, पनवेल-कान्हेरी राष्ट्रीय उद्यान आदी टप्पे पालथे घातले आणि ते पूर्ण तयारीनिशी या सफारीत सहभागी झाले.