गुरुवार सकाळपर्यंत ४ हजार९९१ मिलिमीटर पावसाची नोंद

सप्टेंबर महिना संपत आला तरी यावर्षी पाऊस सुरूच असून नवी मुंबई शहरात आतापर्यंत ४ हजार ५०१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरण परिसरात १९२१ या वर्षी ७ हजार मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यानंतर यावर्षी सर्वाधिक ४९९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

यावर्षी सांगली, कोल्हापूरला पुराचा तडाखा बसल्यानंतर बुधवारी रात्री पुणे शहर व जिल्ह्यात ढगफुटीसारखा पाऊस झाला. सप्टेंबर महिना संपत आला तरी पाऊस सुरूच आहे. नवी मुंबईतही यावर्षी जोरदार पाऊस झाला आहे. शहरात आतापर्यंत ४,५०१ मिलिमीटर एवढी पावसाची नोंद झाली आहे. शहरात यावर्षी सखल भागात मोठय़ा पावसात वारंवार पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरण परिसरातही यावर्षी १९२१ नंतरचा सर्वाधिक पाऊस पडला आहे. ४९९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात पुढील जुलै २०२० पर्यंत पुरेल एवढा जलसाठा असून अतिरिक्त होणारे पाणी धरणातून विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती मोरबे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता मनोहर सोनावणे यांनी दिली.