डांबरीकरणामुळे रस्त्यांच्या उंचीत वाढ; अंदाज न आल्याने दुचाकीस्वारांचे अपघात

डांबरीकरणाच्या कामात नवी मुंबई पालिकेकडून शिस्त पाळली न गेल्याने अपघातांची भीती व्यक्त केली जात आहे. रस्त्यातील मलनिस्सारण वाहिन्यांसाठी  तयार केलेल्या ‘मॅनहोल’ हे  रस्त्याच्या उंचीपेक्षा खोल असल्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. यंदा ऑक्टोबर अखेपर्यंत पाऊस लांबल्याने जुलैच्या पावसात पडलेले खड्डे पालिका प्रशासनाला बुजवता आले नाहीत. यात शहरातील प्रमुख रस्त्यांसह अतंर्गत रस्त्यांवरील लहान  खड्डय़ांचा आकार वाढलेला होता. मध्यंतरी पालिकेच्या रस्ते दुरुस्ती विभागाच्या वतीने या खड्डय़ांमध्ये फरशांचे तुकडे (पेव्हर ब्लॉक) टाकून ते बुजविण्यात आले होते. या साऱ्या स्थितीवर ‘लोकसत्ता महामुंबई’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पालिकेने डांबरीकरणास सुरुवात केली. मात्र हे करताना पालिकेच्या अभियंत्यांनी रस्त्यातील ‘मॅनहोल’ यांची उंची न वाढविल्याने त्याभोवती डांबराचे थर वाढले आहेत.

डांबरीकरणामुळे वाढलेल्या थरांमुळे वाहनचालकांना समोरील ‘मॅनहोल’ नजरेत येत नाहीत आणि आल्यास ते वाचविण्यासाठी अनेकदा ‘ब्रेक’ मारावे लागतात. यात दुचाकीस्वारांना गंभीर अपघातांना सामोरे जावे लागते. या मार्गावरून एखादी दुचाकी वेगाने ‘मॅनहोल’च्या जागी आदळल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे पालिकेने शहरात डांबरीकरण करताना रस्त्यात असणारी ‘मॅनहोल’ची झाकणेही रस्त्याच्या उंचीला समांतर आणण्याची मागणी केली जात आहे.

शहरात मुख्य रस्त्यांवर असलेले खड्डे बुजवण्याचे काम नवी मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आले असले तरी विविध ठिकाणी असलेल्या व शहरातील विविध विभागांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर मात्र काही प्रमाणात खड्डे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अंतर्गत रस्त्यावरील खड्डेही महापालिकेने बुजवावेत, अशी मागणी  नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात पालिका शहर अभियंते  सुरेंद्र पाटील यांच्याशी वारंवार संपर्क करूनही तो होऊ शकला नाही.

‘मॅनहोल’भोवती पांढरा रंग

डांबरीकरणाची कामे करताना ठेकेदार डांबरीकरणाचे कामे करतो.परंतु मलनिस्सारण वाहिन्यांचे मॅनहोल आहे त्याच जागेत राहत असल्यामुळे या ‘मॅनहोल’भोवती पांढऱ्या रंगाच्या रेषा काढल्या जातात.  त्यामुळे काही दिवस ‘पुढे खड्डा आहे’ याची माहिती चालकांना वा स्वारांना मिळते, परंतु  काही दिवसांत पांढरा रंग उडाल्यानंतर दुचाकी तसेच चारचाकी चालकांना मॅनहोलचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होतात, अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली.

पालिका अभियंताच मॅनहोलमध्ये

नेरुळ विभागातील पालिकेच्या अभियंता विभागातील एका विद्युत अभियंत्याला डांबरामुळे तयार झालेल्या उंच रस्त्याचा आणि खोलातील ‘मॅनहोल’चा अनुभव आला. ते दुचाकीवरून जात असताना त्यांची भरधाव दुचाकी ‘मॅनहोल’च्या खड्डय़ात गेली.

वाहनचालकांची कोणतीही चूक नसताना  त्यांना अपघातांना सामोरे जावे लागत आहेच, पण अशा घटनांमध्ये वाहनांचे नुकसानही होत आहे. त्याची भरपाई नेमकी कशी घ्यायची आणि कोणाकडून घ्यायची, हा प्रश्न आहे. -दिनेश पाटील, नागरिक