पुनर्विकासात शासनाची अट

नवी मुंबई : नवी मुंबईत वाहनतळ समस्या गंभीर झाली असून मुख्य व अंर्तगत रस्त्यावर हजारो वाहने रात्रंदिवस उभी असल्याचे दिसून येते. त्यावर सरकारने २ डिसेंबर रोजी जारी केलेल्या एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीत तोडगा शोधला आहे. पुनर्विकास किंवा नवीन इमारत बांधणाऱ्या विकासकांना इमारतीच्या खाली वाहनतळांसाठी दोन मजले राखीव ठेवण्याची अट घातली आहे. यामुळे वाहनतळ समस्या काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्य सरकारने मुंबईवगळता आठ शहरांसाठी एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली नुकतीच मंजुर केली आहे. या नियमावली अंर्तगत कमीत कमी तीन व जास्तीत जास्त पाचपर्यंत वाढीव चटई निर्देशांक देण्याची तरतूद करण्यात आली आहे. नवी मुबंईत तीनपेक्षा जास्त मिळणारा वाढीव चटई निर्देशांक हा अतिरिक्त विकत घ्यावा लागणार आहे. वाढीव एफएसआय हा इमारतीच्या बांधकामासमोरील रस्त्याच्या आकारमानावर अवलंबून आहे. एक हजार चौरस मीटर क्षेत्रफळ भूखंडाच्या समोरील रस्ता १५ मीटर रुंदीचा असल्यास त्यांना तीन वाढीव चटई निर्देशांक वापरता येणार आहे. अशाच प्रकारे तो नऊ चौरस मीटर रुंदीच्या रस्त्यावर समोर केवळ दोन एफएसआय मंजूर होणार आहे. जादा एफएसआय घेणाऱ्या विकासकांना इमारतीतील घरांच्या तुलनेत वाहनतळांची तरतूद करावी लागणार आहे. त्यासाठी बेसमेंट आणि तळमजला हे या वाहनतळांसाठी राखीव ठेवावे लागणार आहेत.

गेल्या ५० वर्षांत झालेला विकास आणि वाढलेल्या दरडोई उत्पन्नामुळे अनेक रहिवाशांकडे दुचाकी व चारचाकी वाहने आहेत. नवी मुंबईकरांच्या एका सर्वेक्षणानुसार प्रत्येक घरात किमान दुचाकी वाहन असून दरडोई उत्पन्न पंधरा ते वीस हजाराच्या घरात आहे. त्यामुळे नवी मुंबईत दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली असून वाहनतळांची समस्या उद्भवली आहे.  त्यामुळे पालिकेने बेलापूर सेक्टर ११ मध्ये एक बहुमजली वाहनतळाचे काम सुरू केले आहे. त्यासाठी पालिका २९ कोटी रुपये खर्च करून हे सार्वजनिक पे अ‍ॅन्ड पार्कचे वाहनतळ उभारणार आहे.

नवीन एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीत सिडको व खासगी इमारतीच्या पुनविर्कास व नवीन बांधकामात सर्व रहिवाशांच्या वाहनांसाठी वाहनतळ तसेच इमारतीत येणारे अभ्यागत यांच्यासाठी काही राखीव वाहनतळाची तरतूदही करावी लागणार आहे. विकासकांना पुरेसा वाढीव चटई निर्देशांक मिळत असल्याने वाहनतळांची तरतूद करणे शक्य होणार आहे. त्यामुळे नवी मुंबईतील वाहनतळ ही निर्माण झालेली गंभीर समस्या येत्या काळात सुटणार अशी आशा व्यक्त केली जात आहे.

जुन्या इमारतीत वाहनतळ नाही

सिडकोने ५० वर्षांपूर्वी नवी मुंबईचा विकास केलेला आहे. त्यावेळी तयार करण्यात आलेल्या आराखडय़ानुसार सिडकोच्या जुन्या इमारतीतील रहिवाशांच्या वाहनांसाठी वाहनतळांची तरतूदच करण्यात आलेली नाही. सिडकोने अनेक ठिकाणी बैठी घरे बांधलेली आहेत. या रहिवाशांसाठी साधी दुचाकी वाहनतळ राखीव ठेवण्यात आलेले नाही.