नवी मुंबई महापालिकेत आज अविश्वास ठराव

नवी मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार, गैरव्यवहार यांना चाप लावणारे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव मंगळवारी दुपारी १२ वाजता पालिकेच्या सभेत मांडला जाणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची मुंढेविरोधी भूमिका स्पष्ट असल्याने हा ठराव मंजूर होण्याची केवळ औपचारिकताच बाकी उरली आहे. मात्र, ठराव मंजूर झाला तरी मुख्यमंत्री फडणवीस हे कायद्यातील तरतुदीनुसार तो पुढे फेटाळून मुंढे यांना अभय देतील, असे संकेत मिळत आहेत.

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरुद्धच्या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षांनी आपापल्या नगरसेवकांसाठी पक्षादेश जारी केले आहेत. नवी मुंबई पालिकेच्या बाहेरही मुंढे यांची कोंडी करण्याची त्यांच्या विरोधकांची योजना आहे. मुंढेविरोधातील पक्षांचे नगरसेवक तेथे शक्तिप्रदर्शन करतील, असे दिसते आहे. तर, भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश स्तरावरील नेत्यांनी सोमवारी नवी मुंबईतील आपल्या नगरसेवकांची भेट घेऊन त्यांना ठरावाच्या विरोधात मतदान करण्याचे आदेश दिले. या पाश्र्वभूमीवर मुंढेविरोधी ठराव मंजूर झाला तरी तो फेटाळण्याचा राज्य सरकारला पूर्ण अधिकार असून, कायद्यातील तरतुदीनुसार मुंढे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अभय देतील, असेच संकेत मिळत आहेत.

मुंबई महानगरपालिका किंवा मुंबई प्रांतिक महानगरपालिका कायद्यात कोणत्याही महानगरपालिकेने केलेला कोणताही ठराव फेटाळण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे. एखादा ठराव बहुमताच्या जोरावर मंजूर झाला, पण हा ठराव शहराच्या विकासाला बाधक ठरत असेल तर तो सरकारला कायद्यानुसार फेटाळता येतो. ठाणे शहरात सन १९९७-९८ मध्ये तत्कालीन पालिका आयुक्त टी. चंद्रशेखर यांनी रस्ता रुंदीकरणाची मोहीम राबविली होती. या मोहिमेच्या विरोधात सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले होते.

रस्तारुंदीकरण करताना बेघर किंवा विस्थापित होणाऱ्यांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या मुद्दय़ावर ‘ही महानगरपालिका आयुक्तांच्या विरोधात अविश्वास व्यक्त करीत आहे’, अशा आशयाचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर झाला होता. विशेष म्हणजे तेव्हा राज्यात आणि ठाणे महानगरपालिका दोन्हीकडे शिवसेनेचीच सत्ता होती. महापालिका कायद्यातील तरतुदीच्या आधारे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहाने मंजूर केलेला ठराव तात्काळ फेटाळला होता. अविश्वास ठराव मंजूर होऊनही चंद्रशेखर पुढे आयुक्तपदावर कायम राहिले होते.

‘जर-तर’वर प्रतिक्रिया नाही -मुख्यमंत्री

‘तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध मांडण्यात आलेला अविश्वास ठराव मंजूर झाला तरी आपल्या अधिकारात त्यांना अभय देणार का’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी, ‘जर-तरवर प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही’, असे सांगत ‘भाजप या ठरावाला साथ देणार नाही’, असे ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.

ठराव मंजूर झाला तरी ठाण्याच्या धर्तीवरच हा ठराव नामंजूर केला जाईल किंवा फेटाळला जाईल, असेच संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तर, ‘महापालिकेने केलेला कोणताही ठराव फेटाळण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे’, असे नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी स्पष्ट केले.