राज्यात ५० गावांत समित्या; ऐरोलीत मुख्य केंद्र

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूनम धनावडे, नवी मुंबई</strong>

ऐरोली येथील सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्रातून राज्यात मत्स्य व्यवसायाचे जाळे पसरविण्याचे ठरविण्यात आले आहे. प्राथमिक स्तरावर मत्स्यपालन करण्याचे काम येथे सध्या सुरू असून राज्यात या केंद्रातून मत्स्यशेतीचे नियोजन करण्यात येत असल्याचे येथील वनविभाग अधिकाऱ्यांनी सांगितले.

ऐरोली येथील केंद्रात नवी मुंबईसह ठाणे, मुंबईतील पर्यावरणप्रेमींना खाडीकिनाऱ्यांचे महत्त्व, जैवविविधतेची माहिती व किनाऱ्यांच्या संरक्षणाबाबत माहिती होण्यासाठी पक्षिनिरक्षण, नौकाविहार उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर आता नवी मुंबईत प्रथमच मत्स्यशेती सुरू करून इतर जिल्ह्य़ातील छोटय़ा व्यावसायिकांना रोजगार, उद्योगनिर्मिती करण्याचे ठरविण्यात आले आहे.

मँग्रोव्हज फाऊंडेशनच्या माध्यमातून शासन निधीअंतर्गत या ‘ओरनामेंटल फिशर युनिट’ला सुरुवात करण्यात येत आहे. तसेच राज्यातील विविध गावांत ‘मँग्रोव्हज को मॅनेजमेंट कमिटी’ स्थापन करण्यात आलेल्या आहेत. साधारणत: ५० गावांत आशा कमिटी स्थापन केल्या असून नवी मुंबईतही कमिटी स्थापनेची प्रक्रिया सुरू आहे.

या मत्स्यशेती पालन केंद्रात विविध प्रकारचे रंगीत मासे यांना मास्टर प्रजनन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर निर्माण झालेले मासे हे राज्यातील इतर जिल्ह्य़ांतील स्थापन केलेल्या कमिटींना देण्यात येणार आहेत. येथे त्यांचे पालनपोषण करून मोठे झाल्यानंतर ते मासे हे केंद्र पुन्हा खरेदी करणार आहे. मोठे झालेले मासे मागणीनुसार इतर ठिकाणी पाठविले जाणार आहेत.

कशी होणार मत्स्यशेती

या मत्स्यशेती केंद्रात ६० फिश टँक ठेवण्यात आले आहेत. यामध्ये सध्या प्राथमिक स्वरूपात माशांना कोणत्या स्वरूपाचे पोषक वातावरण लागले, कोणत्या पाण्यावर त्यांची उपजीविका अधिक उत्तम होईल, याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या एक-दोन फिश टँकमध्ये समुद्राचे व खाडीचे पाणी आणून त्यावर मत्स्यपालन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक स्तरावर मत्स्यपालन करण्याचे काम सुरू आहे. या केंद्राचे उद्घाटन महिनाभरात होणार असून त्यानंतर मोठय़ा प्रमाणात येथे मत्स्यशेती व्यवसाय केंद्र उपलब्ध करण्यात येणार आहे.

 

 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Employment from colored fish farming
First published on: 17-10-2018 at 01:17 IST