दर घसरले; उपनगरांतील खरेदीदारांची पाठ

नवी मुंबई : पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत नेहमीप्रमाणे शेतमालाची आवक झाली. मात्र उपनगरांतील ग्राहक बाजारात फिरकला नसल्याने शेतमाल पडून राहिला. ८० टक्केपर्यंत व्यापार पावसामुळे न झाल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे. याचा सर्वाधिक फटका भाजीपाल्याला बसला. त्यामुळे भाज्यांचे दरही १० ते २० टक्के घसरले.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मंगळवारी रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावत सायंकाळी पाच वााजेपर्यंत संततधार पाऊस पडत होता. मुंबईसह राज्यातही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र शेतमालाची आवक नेहमीप्रमाणेच झाली.

एपीएमसी बाजारातील ८० ते ९० टक्के शेतमाल हा उपनगरांत जात असतो. मात्र पावसामुळे उपनगरांतून येणारे ग्राहकच बाजारात आले नाहीत. भाजीपाल्याची आवक झाली, मात्र मालाला उठाव नव्हता. बुधवारी भाजीपाला बाजारात ४५० गाडय़ा आवक झाली होती. मात्र २० टक्के ग्राहक आले नाहीत. त्यामुळे १५ ते २० टक्के भाजीपाला शिल्लक राहिला असून त्याचा फटका व्यापाऱ्यांना बसला आहे. यामुळे भाजीपाल्याच्या दरावरही परिणाम झाल्याचे दिसून आले. १० ते १२ टक्के बाजारभाव कमी झाले होते.

फळ बाजारातही २०० ते २५० गाडय़ांची आवक होते. पावसामुळे ही आवक काही प्रमाणात कमी झाली, मात्र ग्राहकच नसल्याने ८० टक्के व्यापार झाला नसल्याचे व्यापारी संजय पिंपळे यांनी सांगितले. कांदा-बटाटा बाजारात ८० गाडय़ा आवक होती. पावसामुळे बुधवारी या बाजारात व्यवहार उशिरा सुरू झाले. त्यामुळे २५ टक्के मालाची विक्री झाली नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. पाऊस पुढील दोन दिवस पडण्याची शक्यता आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर गुरुवारी बाजारात शेतमालाच्या आवकीवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.