नवी मुंबई : सोमवारी झालेल्या वादळी पावसामुळे तसेच मंगळवारच्या पावसाच्या वातावरणामुळे उपनगरातून भाजीपाला खरेदीसाठी ग्राहक फिरकला नाही. त्यामुळे एपीएमसीतील भाजीपाला बाजारात १५ ते २० टक्के भाजीपाला सडून गेला असून ४० ते ५० टक्के भाज्यांचे दर उतरले आहेत.
भाजीपाला बाजारात सोमवारी ५३८ तर मंगळवारी ३४५ वाहने आवक झाली. मात्र वादळ व पावसाच्या भीतीने उपनगरांतील ग्राहक घाऊक बाजारात फिरकलाच नाही. त्याचा व्यापारावर परिणाम झाला आहे. आवक मालापैकी ५० टक्केच मालाची विक्री झाली आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरावरही परिणाम होत दरात ४० ते ५० टक्के घसरण झाली. बाजारात भाजीपाला शिल्लक राहिला असून तो फेकून देण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे. त्यातील १५ ते २० टक्के पालेभाज्या खराब झाल्या असल्याची माहिती व्यापारी संजय पिंगळे यांनी दिली आहे.
आधी प्रतिकिलो ८ ते २० रुपयांवर असलेल्या भाज्या आता ५ ते १० रुपयांवर घाऊक बाजारात मिळत आहेत.
बाजारभाव (प्रातिकिलो रुपयांत)
भाजी आधी आता
कोबी ६ ४
फ्लॉवर १० ६
दुधी १२ ८
शिमला १६ १२
शेवगा २४ २०
गवार २४ २०
वांगी १० ६
दोडका २० १६
मिरची ३२ २८
आले २२ १८