पालिका आयुक्तांचे आदेश; झोपडय़ा रिकाम्या करण्याच्या नोटिसा

नवी मुंबई सोमवारी कमी कालावधीत शहराला जोरदार पावसाने झोडपल्याने याचा सर्वाधिक फटका बसला तो इंदिरानगर व बोनसरी भागातील झोपडपट्टीला. या भागात घरांत पाणी घुसले, तर चार झोपडय़ा वाहून गेल्या. या परिसराची पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी मंगळवारी पाहणी केली. यानंतर नाला अडवणाऱ्या दगडखाण मालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच तुर्भे विभाग कार्यालयातर्फे ‘महावीर कॉरी’ परिसरातील सुमारे हजार झोपडीधारकांना झोपडय़ा तत्काळ रिकाम्या करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. यामुळे या झोपडीधारकांनी, आम्ही ३० वर्षांपासून येथे राहत असून अचानक जायचे कोठे? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

तुर्भे एमआयडीसीतील बोनसरी भागातील नैसर्गिक नाल्यालगतच्या वसाहतीत सोमवारी पावसाचे पाणी शिरले होते. नैसर्गिक नाल्यात दगडखाणीतील दगड व माती आल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला व पाणी घरांत शिरले. पालिका कर्मचाऱ्यांनी खाणीतील मोठे दगड जेसीबी व पोकलनच्या साहाय्याने काढत पाण्याला वाट करून दिली. त्यानंतर पाण्याचा निचरा झाला. तुर्भे गणपतीपाडा येथील ‘महावीर कॉरी’ ठिकाणच्या नैसर्गिक नाल्याशेजारील वस्तीमधील चार झोपडय़ा पावसाळी पाण्यात वाहून गेल्या व पंधरा घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले. या ठिकाणांची पालिका आयुक्तांनी मंगळवारी पाहणी केली. या ठिकाणी दगडखाण मालक पीर मोहम्मद शेख यांनी आपल्या दगडखाणीकडे जाण्यासाठी रस्ता बनविल्याने नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बंद झाला आहे. त्यामुळे दगडखाणी मालकांना आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यानुसार नोटीस बजाविण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

या परिसरात पेंटर, ओंकार, महावीर, जय माता दी, भरत शेठ, धोत्रे आदी दगडखाणी आहेत. त्यामुळे परिसरात मोठय़ा प्रमाणात बेकायदा झोपडय़ा निर्माण झाल्या आहेत. पावसाळ्यात धोकादायक स्थितीत येथील झोपडीधारक राहत असून त्यांना मंगळवारी पालिका कर्मचाऱ्यांनी घरोघरी जात सुमारे एक हजार झोपडीधारकांना तत्काळ घरे रिकामी करण्याच्या नोटिसा दिल्या असल्याची माहिती तुर्भे विभागाच्या साहाय्यक आयुक्त संध्या अंबादे यांनी दिली. तर येथील नाल्याला संरक्षक भिंत बांधण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, अशा सूचनाही आयुक्तांनी अभियांत्रिकी विभागाला दिल्या आहेत.

पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांना कळविले असून पालिका आयुक्तांनी पाठवलेल्या पत्राबाबत योग्य ती माहिती घेत कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.

‘आम्ही जायचे कुठे?’

आम्ही आजोबांच्या काळापासून येथे राहत आहोत. आमच्याकडे आधारकार्डपासून सर्व कागदपत्रे आहेत. पालिकेने घरे रिकामी करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. आता आम्ही जायचे कोठे? असा प्रश्न येथील सुरेश कोर यांनी उपस्थित केला, तर आम्ही गरीब आहोत. भर पावसात घर रिकामे केले तर राहायचे कोठे व खायचे काय, असे रमेश जाधव यांनी सांगितले.

येथील प्रवाह वाहून जाण्याचा मार्ग बंद करणाऱ्या पीर मोहम्मद शेख यांना नोटीस बजावून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच ठाणे जिल्हाधिकारी यांनाही संबंधित दगडखाण मालकांना नोटीस बजावण्याबाबतचे पत्र दिले आहे.

– डॉ. रामास्वामी एन., आयुक्त