भांडुपमधील टोळीतील घटना

नवी मुंबई रविवारी रात्री ऐरोली परिसर पुन्हा एकदा गोळीबाराने हादरला. भांडुपमधील एकाच टोळीतील दोन गटात कंत्राटावरून असलेल्या वादावरून हा गोळीबार झाला असून सुदैवाने यात कोणी मयत झाले नाही. पळून जाणारा एकजण किरकोळ जखमी झाला आहे. याबाबत शांतताभंग, दहशत माजवणे, हत्येचा प्रयत्न आदी कलामान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

यातील तीन आरोपींना घाटकोपर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे  समजते. मात्र नवी मुंबई पोलिसांनी दुजोरा दिला नाही.

भांडुपमध्ये बांधकाम व्यवसायातील कंत्राट काही लोक मिळून घेत होते. याच व्यवसायातून दोन गट पडले. यातून घोडबंदर येथे राहणारा अमित भोगले आणि भांडुप येथे राहाणारा आदित्य क्षीरसागर यांच्यात वाद होता. भोगले याला मिळालेल्या एका कंत्राटामध्ये क्षीरसागर याने खोडा घातल्याने झालेल्या वादामुळे मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ऐरोली सेक्टर १० येथील गरम मसाला हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर क्षीरसागर व सागर जाधव जेवणासाठी बसले होते. काही वेळाने याच हॉटेलमध्ये तळ मजल्यावर बसलेले अमित भोगले व अन्य काही जण पहिल्या मजल्यावर आले. यातील अमित भोगले याने क्षीरसागर याच्यावर बंदूक रोखून गोळी झाडली. मात्र क्षिरसागर यातून बचावला. त्याने वरूनच खाली उडी टाकून तो हॉटेलच्या मागच्या भागातून पळून गेला. मात्र त्याने उडी मारली त्या ठिकाणी असलेल्या एका कारची काचही फुटली. त्यामुळे त्याच्या पायाला व हाताला मार लागला. मात्र अंधाराचा फायदा घेत संजय सोसायटीच्या आडोशाचा आधार घेत तो पळून गेला. तेथेही त्याच्या दिशेने दुसरी गोळी झाडण्यात आली. हा सर्व थरार रात्री साडेअकाराच्या सुमारास घडला. घटनेनंतर आदित्य क्षीरसागर याने कंट्रोलला फोन केला. त्यावेळी साहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. आजही सकाळी पुन्हा घटना स्थळाची पाहणी करण्यात आली.

याबाबत आदित्य क्षीरसागर याने दिलेल्या फिर्यादीवरून मूळ भांडुपचा पण काही महिन्यांपूर्वीपासून घोडबंदर येथे राहावयास गेलेला अमित भोगले व रामचंद्र राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, अशी माहिती रबाळे पोलिसांनी दिली. या प्रकरणी ठाण्याच्या एका प्रतिष्ठित नगरसेवाकाचीही दिवसभर कसून चौकशी करण्यात आली.

एकाच टोळीत कंत्राटावरून पडलेल्या दोन गटांतील भांडणातून हा प्रकार घडला आहे. याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला असून सीसीटीव्ही चित्रीकरण तपासणी करण्यात येत आहे. आरोपींना लवकरच गजाआड करण्यात येईल.

-सतीश गोवेकर, साहाय्यक पोलीस आयुक्त