नवी मुंबई : टाळेबंदीमुळे माथेरानमधील घोडे आणि त्यांच्या चालकांची उपासमार सुरू होती. ‘लोकसत्ता’ने हे वृत्त दिल्यानंतर रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे चिरंजीव प्राणीमित्र अनंत अंबानी यांनी मदतीचा हात दिला आहे. त्यांनी येथील सर्व घोडय़ांसाठी प्रत्येकी ४९ किलो भुशाच्या गोणींचे वाटप केले आहे. चालकांनाही लवकरच अत्यावश्यक वस्तूंचे वाटप केले जाणार आहे.

देशात प्रवासासाठी घोडय़ांचे एकमेव पर्यटन स्थळ ही माथेरानची ओळख. माथेरानमध्ये घोडय़ांशिवाय इतर प्रवासी वाहनाला परवानगी नाही. त्यामुळे २३५ घोडेमालकांचे ४६० प्रवासी घोडे पर्यटकांचे सेवेत आहेत. या घोडय़ांमुळे शेकडो घरांना रोजगार मिळतो. मात्र टाळेबंदीमुळे पर्यटन शून्यावर गेल्याने दोन महिन्यांपासून एकाच जागी उभ्या असलेल्या येथील घोडय़ांना विविध आजारांनी ग्रासले आहे. त्यामुळे घोडेमालक हवालदिल झाले आहेत. भुसा, बाजरी, गवत आणि कुटी हा खुराक घोडय़ांना देण्याची ऐपत येथील घोडेमालकांमध्ये राहिलेली नाही. ही घोडे व त्यांच्या चालकांची होत असलेली उपासमार ‘लोकसत्ता’ने (२२ मे) मांडली होती.

केवळ घोडय़ांसाठी लागणारा खुराकच नाही तर येथील शेकडो भटके कुत्रे यांना तयार खाद्याच्या आठ गोणी व एक हजार बिस्किटचा पुरवठा त्यांनी केला आहे.

घोडय़ांसाठी खुराक देणारा मोठा दानशूर असावा लागतो, असे अश्वचालक राकेश कोकळे यांनी सांगितले. रिलायन्स समूहाकडून प्राण्याशिवाय इतर गरीब गरजू घटकांना जीवनावश्यक वस्तूंचे लवकरच वाटप केले जाणार असल्याचे कोकळे यांना सांगितले.