भाजप प्रवेशासाठी नगरसेवकांकरवी वातावरण निर्मिती; आजच्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता

नवी मुंबई ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व नवी मुंबईतील पक्षाचे सर्वेसर्वा गणेश नाईक यांच्या पक्षांतरासंदर्भात गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेली चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे. महापौर बंगल्यावर सोमवारी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या बहुतांश नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेशाची इच्छा व्यक्त करत नाईक यांच्या भाजप प्रवेशासाठी अनुकूल वातावरण निर्मिती केली. खुद्द नाईक कुटुंबाकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नसली तरी, मंगळवारी नाईक कुटुंबीय नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.

गणेश नाईक व त्यांचे पुत्र आमदार संदीप नाईक हे भाजप प्रवेशासाठी इच्छुक असल्याची चर्चा गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर महापौर जयवंत सुतार आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी सोमवारी महापौर बंगल्यावर आयोजित केलेल्या गटारीपूर्व स्नेहभोजनाची बैठक हे नाईक यांच्या भाजप प्रवेशाची वातावरण निर्मिती करण्यासाठी मोठे निमित्त ठरले. बैठकीत सुरुवातीला महापौर जयवंत सुतार यांनी सद्य राजकीय स्थिती उपस्थितांसमोर मांडली. त्यानंतर चार तास चाललेल्या या बैठकीत काही नगरसेवकांनी आपली मते व्यक्त केली.  त्यानंतर भाजप प्रवेशासाठी इच्छुक असल्याचे दर्शवण्यासाठी हात वर करून निर्णय घेण्यात आला. ‘नवी मुंबईचा विकास महत्त्वाचा आहे. मात्र, विकासाभिमुख प्रस्तावांना मंजुरी मिळवण्यात प्रशासकीय पातळीवर अडचणी येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या बाबत आम्हा सर्वाच्या भावना नाईक यांच्या समोर मांडण्यात येतील,’ असे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मंगळवारी सकाळी अकरा वाजता हे भाजप प्रवेश इच्छुक नगरसेवक नाईक यांना भेटणार असून त्यांना भाजपसाठी गळ घालणार आहेत. पदाधिकारी व नगरसेवक प्रवेश करण्यासाठी इच्छुक असल्याचे भासवून नाईक यांच्यावर दबाव असल्याचे भासवण्यात येत असले, तरी नाईकांकडूनच ही पक्षांतरपूर्व वातावरण निर्मितीची योजना आखण्यात आल्याची चर्चा आहे.

शिवसेना, भाजपमधून विरोध

बावखळेश्वर मंदिरावरील कारवाईने शिवसेनेबरोबर निर्माण झालेली कटुता विसरून नाईक सर्मथकांनी शिवसेना प्रवेशासाठी प्रयत्न केले होते. शिवसेनेबरोबर फारकत घेतल्यानंतरही नाईक यांचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर सरतेशेवटी सलोख्याचे संबंध निर्माण झाले होते. त्यामुळे जुन्या घरात जाण्यास नाईक तयार होते, पण ठाणेदार सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे यांनी त्यांच्या प्रवेशाला हरकत घेतल्याचे समजते. तर दुसरीकडे, भाजपमध्येही नाईक यांच्या प्रवेशाच्या चर्चेवरून कुरबुरी सुरू आहेत. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे व शिर्डी संस्थानाचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्यासह पक्षाचे स्थानिक पदाधिकारी या पक्षप्रवेशाला विरोध करण्याची शक्यता आहे.

सात नगरसेवक विरोधात?

बैठकीत सुरेश कुलकर्णी, देवीदास हांडे-पाटील, अशोक गावडे हे नगरसेवक उपस्थित नव्हते. तर माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या भगिनी नगरसेविका अ‍ॅड. भारती पाटील यांनी आपला निर्णय राखून ठेवला आहे. आमदार शशिकांत शिंदे समर्थक नगरसेवक शंकर मोरे व सायली शिंदे उपस्थित होते. मात्र त्यांच्या निर्णयाबाबत साशंकता आहे.५२ नगरसेवकांपैकी सात ते आठ नगरसेवक ऐनवेळी पक्षांतर टाळतील, अशी शक्यता आहे.

भाजपकडे आयती पालिका?

नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास राष्ट्रवादीतील नगरसेवकांचा मोठा गटही पक्षांतर करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास महापालिकेत आपोआप भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. त्यासोबतच एक माजी मंत्री, विद्यमान आमदार, माजी खासदार आणि ४०हून अधिक नगरसेवक असा मोठा गट भाजपच्या तंबूत डेरेदाखल होण्याची शक्यता आहे.