जागोजागी ढीग; स्वच्छता अभियानाला हरताळ

पनवेल : सिडकोकडून कचरा व्यवस्थापन हस्तांतरण करून तीन महिने उजाडले तरी पनवेल शहरातील कचरा आजही रस्त्यांवर, गल्लीबोळात उघडय़ावर पडलेला दिसत आहे. विशेष म्हणजे स्वच्छ सर्वेक्षणात पालिका सहभागी आहे. स्वच्छतेचे फलक लावलेल्या ठिकाणचाही कचरा उचलला जात नाही. त्यामुळे या सर्वेक्षणाचा पुरता बोजवारा वाजला आहे.

तीन महिन्यापूर्वी पालिकेने सिडकोकडून कचरा व्यवस्थापन हस्तांतरित करून घेतले. त्यानंतर कचरा उचलण्यासाठी गाडय़ांचीही खरेदी केली. त्याच्या उद्घाटन प्रसंगी पालिका आयुक्तांनी कचरामुक्त पनवेल करण्याची घोषणा केली. मात्र आजही या परिस्थितीत म्हणावा तसा बदल झालेला नाही. त्यात विशेष म्हणजे स्वच्छ अभियान सुरू असून केंद्राचे पथक पाहणी करण्यासाठी लवकरच दाखल होणार असताना जागोजागी कचरा पडलेला असून काही भागात अजूनही उघडय़ावर जाणारेही दिसत आहेत. जुने पनवेलमध्ये तर एका ठिकाणी स्वच्छता सर्वेक्षणाचा फलक वर झळकत आहे व खाली कचरा साचलेला असून त्यावर जनावरे तुटून पडलेली आहेत. हे पनवेल शहरातील भयानक चित्र आहे. मालधक्का परिसर, आंबेडकर चौक, उरण नाका, एस.टी. स्थानक, पनवेल पंचायत समितीच्या समोर, सोसायटी नाका, टपाल नाका, बाजारपेठ परिसरात कचरा दिसत आहे. स्वच्छता सर्वेक्षणाचे फलक लावले आहेत. मात्र स्वच्छतेचा अभाव दिसत असल्याचे रहिवासी सुजाता पाटील यांनाी सांगितले.

पनवेल हगणदारीमुक्त झाले का?

पनवेल शहर हगणदारीमुक्त म्हणून जाहीर झाले आहे. मात्र शौचालयाचा वापर न करता उघडय़ावर जातानाचे दृश्य आजही कायम आहे. झोपडपट्टी परिसरात आजही शौचलयांचा वापर होताना दिसत नाही. मात्र यावर पालिका फक्त आवाहन करण्यापलीकडे काही करताना दिसत नाही.

२८० सार्वजनिक शौचालयांची निर्मिती महानगरपालिकेच्या माध्यमातून केली असून ४ हजार ५०० वैयक्तिक शौचालये बांधलेली आहेत. आधुनिक स्वरूपाची १६ शौचालये बांधली आहेत. त्यामुळे उघडय़ावर शौचाला जाऊ  नका, कोणी जात असेल तर त्याला अटकाव करा.

 गणेश देशमुख, पालिका आयुक्त

पनवेल शहरात ठिकठिकाणी कचरा पडलेला दिसत आहे.