महिलांसाठीच्या दहाही विशेष तेजस्विनी बसेस एनएमएमटी प्रशासनाकडे दाखल होऊन रस्त्यावर धावण्यासाठी सज्ज आहेत. मात्र उद्घाटनाच्या बडेजावासाठी त्या महिनाभरापासून एनएमएमटीच्या डेपोत पडून होत्या. अखेर परिवहन उपक्रमाने या बसची महिला दिनी महिला प्रवाशांना भेट देण्याचे ठरविले आहे. ८ मार्चपासून त्या नवी मुंबईतील रस्त्यांवर धावणार आहेत.

खास महिलांसाठी चालवण्यात येणाऱ्या दहा तेजस्विनी बसेस एनएमएमटीकडे महिनाभरापूर्वी दाखल झाल्या आहेत. सुरुवातीला १५ फेब्रुवारीचा मुहूर्त ठरविण्यात आला होता. याची तयारीही करण्यात आली होती, मात्र अर्थसंकल्पाचे कारण सांगत उद्घाटन पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर मुख््यमंत्री उद्घाटनासाठी येणार असल्याने त्यांची रखडपट्टी झाली होती.

दोन दिवसांत कधीही आचारसंहिता लागू होणार असल्याने महिलादिनी त्या बसचे उद् घाटन करण्यात येणार असल्याचे परिवहनचे व्यवस्थापक शिरीष आदरवाड यांनी सांगितले.

गर्दीच्या वेळेत खास महिलांसाठी या बसेस चालवण्यात येणार असून महिला विशेष बसच्या चालक व वाहकही महिलाच असणार आहेत. शहरातील गर्दीचे मार्ग असलेल्या व महिलांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या नियमित मार्गावर या बस धावणार आहेत. सर्व बस स्वयंचलित प्रकारातील आहेत. राज्य शासनाकडून प्रतिबस २५ लाख याप्रमाणे २.५ कोटी तर परिवहन उपक्रमाकडून ५ लाखप्रमाणे ५० लाख रुपये असा खर्च करण्यात आला आहे. प्रत्येक बसमध्ये ३२ सीट आहेत.

तेजस्विनीच्या उद्घाटन करण्याचे निश्चित झाले असून ८ मार्चला महिला दिनी महिलांसाठीच्या विशेष तेजस्विनी बसचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याच दिवशी  परिवहनच्या आयटीएमएस प्रणालीचेही उद्घाटन करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

-रामचंद्र दळवी, परिवहन सभापती