News Flash

गौरी-गणपतींना निरोप

पुढच्या वर्षी लवकर येण्याची गळ घालत नवी मुंबईकरांनी सोमवारी गौरी-गणपतींना निरोप दिला.

(संग्रहित छायाचित्र)

पालिका, पोलिसांनी चोख व्यवस्था ठेवल्याने विसर्जन शांततेत

पुढच्या वर्षी लवकर येण्याची गळ घालत नवी मुंबईकरांनी सोमवारी गौरी-गणपतींना निरोप दिला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २३ मुख्य विसर्जनस्थळांवर आणि अन्यत्रही पालिका, पोलीस व वाहतूक पोलिसांनी  चोख व्यवस्था केली होती. ढोल ताशांच्या तालावर नाचत गात गणेशविसर्जन करण्यात आले.

नवी मुंबईतील मुख्य १४ तलावांमध्ये इटालियन गॅबियन वॉल पद्धतीची रचना करण्यात आली असून भक्तजनांनी त्याच विशिष्ट क्षेत्रात श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करून पर्यावरण संरक्षणास हातभार लावला. सर्वच विसर्जनस्थळांवर सुरक्षेच्या दृष्टीने बांबूंचे रोधक लावण्यात आले होते. संबंधित विभागाचे सहाय्यक आयुक्त, विभाग अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली विसर्जनस्थळी जीवरक्षक, स्वयंसेवक यांच्यासह अग्निशमन दलाचे प्रत्येकी २ कर्मचारी कार्यरत होते. विसर्जनस्थळांवर तराफ्यांसह आवश्यक त्याठिकाणी फोर्कलिफ्टची व्यवस्था करण्यात आली होती. विद्युत व्यवस्थेसह जनित्रांचीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. पिण्याचे पाणी आणि प्रथमोपचाराची सुविधा देण्यात आली होती. सर्व विसर्जनस्थळांवर ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी दोन स्वतंत्र निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. प्रसादाच्या फळांसाठी वेगळ्या टोपल्या ठेवण्यात आल्या होत्या. प्रसाद व फळे गरजू मुले व नागरिकांना वितरित करण्यात आली. निर्माल्याची वाहतुक स्वतंत्र वाहनांद्वारे करण्यात आली. निर्माल्याचे पावित्र्य राखण्यासाठी प्रक्रिया प्रकल्पस्थळी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलिसांची शहभर करडी नजर होती. विसर्जनस्थळांवर महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून व्यासपीठ उभारण्यात आले असून त्याठिकाणी स्वागत व सूचनांसाठी ध्वनिक्षेपक व्यवस्था करण्यात आली होती. विसर्जनस्थळी स्वयंसेवक नेमण्यात आले होते, मात्र काही विसर्जनस्थळांवर त्यांच्याकडून विसर्जनासाठी ५१, १५१, २५१ आणि सार्वजनिक गणपतींच्या विसर्जनासाठी ५०० रुपयांची मागणी केली जात होती. याबाबत गणेश भक्तांत नाराजी व्यक्त होत होती.

धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे निर्माल्य कलश

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे कोपरखैरणे, खारघर व दारावे येथे गणेश विसर्जनस्थळी निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. भाविकांनी तलावात निर्माल्य न टाकता कलशात टाकावे, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे. गणपती विसर्जनामध्ये मोठय़ा प्रमाणावर निर्माल्य जमा होते. श्री सदस्य या निर्माल्यापासून खतनिर्मिती करणार आहेत. जमा झालेले निर्माल्य खड्डय़ांत टाकण्यात येणार आहे. त्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत तयार करण्यात येईल. प्रतिष्ठानच्या वृक्षारोपण मोहीमेत आणि पालिकेच्या मोहिमांत हे खत वापरले जाईल.

नवी मुंबई परिमंडळ १मध्ये विसर्जनासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अतिशय शांततेत गौरी व गणरायांचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन तलावांवर कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

– सुधाकर पाठारे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १

शहरात शांततेत विसर्जन करण्यात आले. विसर्जन स्थळी पालिकेने स्वयंसेवक नेमले आहेत. त्यांनी विसर्जनासाठी पैशांची मागणी करून अडवणूक केल्यास तेथील पालिका कर्मचारी, पोलीस, अग्निशमन कर्मचारी यांच्याकडे तात्काळ तक्रार करावी.

– रविंद्र पाटील, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका

गौरी आणि गणपतींच्या विसर्जनासाठी वाहतूक विभागाने शहरभर चोख व्यवस्था केली होती. त्यामुळे विसर्जनकाळात कुठेही वाहतूककोंडी झाली नाही. सर्वसामान्यांना कोणत्याही प्रकारे त्रास न होता विसर्जन निर्विघ्न पार पडले.

– सुनील लोखंडे, पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 3:50 am

Web Title: goodbye to gauri ganapati
Next Stories
1 जनजागृतीसाठी स्वच्छतागीत
2 शहरबात : सिडकोच्या नव्या अध्यक्षांची कसोटी
3 तुर्भेकरांवर बेघर होण्याचे संकट
Just Now!
X