हमीद दाभोलकर यांची मागणी; पंतप्रधान, राष्ट्रपतींची भेट मिळत नसल्याची खंत
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा पुणे येथे खून झाला होता. त्यांच्या खुनाच्या घटनेला २० जानेवारीला ५३ महिने पूर्ण झाले आहेत. तर कॉ. गोिवद पानसरे यांच्या खुनाला ३५ महिने पूर्ण होत आहेत. मात्र त्यांचे मारेकरी सारंग अकोलकर व विनय पवार अद्याप मोकाट आहेत. त्यांना पकडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष कृती दल नेमावे, अशी मागणी अंनिसचे हमीद दाभोलकर यांनी केली. तसेच या प्रकरणांत पंतप्रधान व राष्ट्रपती यांची मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने भेट घेण्याचा वारंवार प्रयत्न केला असूनही भेट होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
अंनिसच्या वतीने दोन दिवसीय युवा संवाद शिबीर बेलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे.
दाभोलकर म्हणाले की, राज्य शासनाकडून दोन्ही खुनांच्या तपासातील दिरंगाईमुळे पोलीस दलाचे हसू होत आहे. सरकारी यंत्रणांच्या दिरंगाईचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र अंनिसतर्फे २० जुल ते २० ऑगस्ट दरम्यान ‘जवाब दो’ आंदोलन देशभर राबवले. जोपर्यंत फरार मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत विवेकवादी लोकांना असलेला धोका कायम आहे.
अनेक मोठमोठय़ा खून प्रकरणांतील आरोपी गजाआड होत असताना विवेकवादी लोकांचे खून करणारे फरारी कसे. त्यामुळे न्यायालयाच्या देखरेखीखाली मारेकऱ्यांना पकडायला विशेष कृती दल नेमावे. सीबीआय व एसआयटी तपास सुरू असून या यंत्रणांच्या तपासाच्या दिरंगाईबाबत सर्वोच्च न्यायालयाने नोटिसा बजावलेल्या आहेत. वारंवार तपास अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. मागील दीड महिन्यापासून पानसरे प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांची साधी नेमणूक केली नाही.
– हमीद दाभोलकर
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 21, 2018 12:58 am